नाशिकरोड (प्रतिनिधी):- येथील पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका मोबाईल चोरट्यास शिताफीने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सुमारे दोन लाख रुपयांचे चौदा मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकरोड शहरातून अनेक मोबाईल चोरी जाणे, हिसकावून नेने आदी प्रकार घडत होते.आचारी काम करणाऱ्या मांगीलाल धर्मा महाराज या युवकाचा मोबाईल चोरून नेल्यामुळे त्याने अज्ञात व्यक्ती विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक विशाल पाटील यांना एक संशयित मोबाईल चोर गुन्हेगार जेलरोड येथील पाण्याच्या टाकीजवळ मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली पोलीस आयुक्त नाईकनवरे,पोलीस उपायुक्त विजय खरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्ह्यायदे, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर, सहायक पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला.
संशयित पाण्याच्या टाकीजवळ येताच त्याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे दोन लाख १० हजार रुपयांचे १४ मोबाईल हस्तगत करण्यात आले. व त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार अनिल बाळकृष्ण शिंदे, मनोहर शिंदे, विष्णू गोसावी, अवि देवरे, राकेश बोडके, सोमनाथ जाधव, कुंदन राठोड, केतन कोकाटे, सागर आडणे आदी सहभागी झाले होते