नाशिकरोड (चंद्रकांत बर्वे) :- जळगाव येथून सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे 11 मोबाईल चोरून मुंबईला पळून जाणार्या बापलेकाला रेल्वे पोलिसांनी सतर्कता राखत रेल्वे प्रवासात ताब्यात घेतले.

लोहमार्ग पोलिसांनी ही कामगिरी केली असून, जळगाव शहर पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात या चोरट्यांना देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, नाशिकरोड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार संतोष पाटील-उफाडे हे जळगावहून काम आटोपून नाशिकरोडकडे येत असताना रेल्वे प्रवासातच त्यांना ते प्रवास करत असलेल्या दादर-अमृतसर रेल्वेच्या एस तीन क्रमांकाच्या बोगीत दोन चोरटे प्रवास करीत आहेत.
त्यांनी जळगावमधील गुरूकृपा मोेबाईल केअर या दुकानातून 11 मोबाईल चोरले असून मुंबईकडे प्रवास करीत आहे. असे गुप्त खबर्यामार्फत समजले. त्यांनी ही बाब नाशिकरोड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी सांगितली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष कुलकर्णी, गुन्हे शोध पथकाचे हवालदार संतोष पाटील-उफाडे, दीपक निकम, विलास इंगळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी प्रधान यांच्या पथकाने मनमाड ते नाशिकरोड दरम्यान चालत्या रेल्वेतच शोधमोहीम राबवून कैलास बलराम ललवाणी (वय 48) व सुमीत कैलास ललवाणी (वय 23, दोघेही रा. सिंधी कॉलनी, वडोदरा, गुजरात) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून दोन लाख रुपये किंमतीचे 11 मोबाईल ताब्यात घेण्यात आले. तसेच जळगाव गुन्हे शाखेचे हवालदार संजय हिवरकर आणि सहकार्यांना खबर देऊन ते आल्यानंतर दोघा चोरट्यांना त्यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. रेल्वे प्रवासातच सतर्कता राखून यशस्वी तपासाबद्दल या पथकाचे रेल्वे पोलीस व नाशिकरोड पोलीस अधिकार्यांना अभिनंदन केले आहे.