Video : नाशिक सायकलिस्टचे सदस्य मोहिंदर सिंग भरज यांनी 68व्या वर्षी पूर्ण केली सायकलिंगची खडतर रेस; “असे” होते रेस मधील आव्हान

नाशिक सायकलिस्टचे सदस्य असलेल्या मोहिंदर सिंग भरज यांनी वयाच्या 68 व्या वर्षी नुकतीच अत्यंत खडतर असलेली सायकल रेस दुसऱ्यांदा पूर्ण केली आहे.

डेक्कन क्लिफहॅंगर (DC) नावाची अत्यंत खडतर अशी सायकल रेस आहे. डेक्कन क्लिफहॅंगर, ही रेस रॅमची (Race Across America) पात्रता -पूर्व रेस आहे.

मोहिंदर सिंग भरज, हे आपल्या देशातील एकमेव असे सायकलिस्ट आहे, ज्यांनी वयाच्या ६0 वर्षाच्या वरील वय असून सुद्धा ही रेस पूर्ण केली आहे आणि ती देखीलएकदा नव्हे तर दोनदा. रेस ची सुरुवात शनिवारी दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता केशव बाग, कर्वेनगर, पुणे येथून करण्यात आली.

रेस मधील आव्हान:

मोहिंदर सिंग भरज यांना, पुणे ते गोवा (पुणे, महाबळेश्वर, कोल्हापूर, बेळगांव, आंबोली, गोवा) ६४३ किमी हे अंतर सायकलने 34 तासांच्या आत पार करायचे आव्हान होते. हा रस्ता खडतर आणि अधिक जिकरीचा होता. जवळपास ६००० मी. एवढी एकूण चढाई या रेस दरम्यान अनुभवायला मिळते आणि ही सायकलिस्टची कस पाहणारी असते.

यापूर्वी मोहिंदर सिंग भरज यांनी ही रेस २०१७ मध्ये वयाच्या ६३ व्या वर्षी सुद्धा पूर्ण केली होती. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर हातपाय पूर्ण गळाले होते. यातून सावरून आणि भरपूर मेहनत घेऊन त्यांनी सराव केला. मोहिंदर सिंग भरज यांनी रेस मध्ये चालवताना आपले जीव आणि प्राण ओतून, जिद्दीने निर्धारित वेळच्या आत (३४ तास) त्यांनी ही रेस पूर्ण केली.

पुण्यातून रेस ची सुरुवात झाल्यानंतर सकाळचे वातावरण आल्हाददायक होते. थोड्याच वेळात कात्रजचा घाट चढायचा होता. त्यानंतर पुढे जाऊन खंबाटकीचा घाट देखील चढायचे आव्हान होते. त्यानंतर वाई फाट्यावरून पाचगणी कडे पसरणी घाट चढून महाबळेश्वरला जाताना तापमानात वाढ होऊन गर्मी जाणवायला लागली होती वातावरण तापू लागले होते. मोहिंदर सर महाबळेश्वरला वेळेच्या आत पोहोचले. दुपारच्या वेळी गर्मीचा सामना करण्यासाठी कुलिंग वेस्ट पाण्यात भिजून ते अंगावर परिधान केले. वेळोवेळी अंगावर पायावर थंड पाणी टाकणे, हे त्यांच्यासोबत मदत करणारे (क्रू मेंबर्स) ने हे काम चालूच ठेवले.

प्रत्येक पंधरा मिनिटाला एनर्जी मिळण्यासाठी, काही ना काही खायला देणे, मग त्यात फळ असो जसे केळी, नारळाचे पाणी, ड्रायफ्रूटचे लाडू, एनर्जी ड्रिंक्स, इलेक्ट्रो लाईट हे सर्व देण्याचे काम सारे क्रूमेंबर्सचे असते. या व्यतिरिक्त प्रत्येक दोन ते चार तास सलग सायकल चालवल्यानंतर, पाच ते दहा मिनिटांचा एक शॉट ब्रेक घ्यायचा आणि स्ट्रेचिंग-मसाज करणे आम्ही ठरवले. रात्रीच्या वेळेस सुरक्षेच्या दृष्टीने लागणारे, रिफ्लेक्टर जॅकेट, पुढचा लाईट, मागचा लाल लाईट लावणे आणि ते बरोबर चालू आहेत का याची खात्री करणे रेसच्या नियमानुसार बंधनकारक असते.

रेसचा मार्ग नंतर मेढाघाटातून साताऱ्याकडे आणि तिथून पुढे बंगलोर हायवे वरती कोल्हापूर बेळगाव आणि त्यानंतर एम.के. हुबली या गावातून परत फिरायचे आणि बेळगावला यायचे आणि तेथून आंबोली घाटातून सावंतवाडीकडे त्यानंतर मुंबई-गोवा हायवेला लागून मापसा पणजी आणि रेसची सांगता बागमलो बीच येथे होती.

निपाणीच्या पुढे संकेश्वर घाट चढल्यानंतर त्यांना रात्री 1 वाजता झोप लागत होती. त्यामुळे 45 मिनिटांचा छोटी झोप किंवा पावर मॅप घेतली पुढे सायकलिंग सुरू केल्यानंतर बेळगावच्या आधी पावसाचे आगमन झाले. या दिवसात असे होणे अपेक्षित नव्हते पण येईल त्या गोष्टीला सामोरे जायचं आणि सायकल चालवत राहणे याला पर्यायच नव्हता. किंबहुना थांबले तर ही रेस वेळेत पूर्ण करणे अतिशय कठीण आहे.
ते बेळगावला 5.30 वाजेच्या दरम्यान पोहोचले. तिथे थोडा ब्रेक घेऊन आंबोलीकडे जायचे होते. हे अंतर साधारण 60 ते 70 किलोमीटरचे होते पण रस्ता खूपच खराब असल्यामुळे सतत दणके जाणवत होते. शिवाय येथे सकाळी साडेसात वाजेपर्यंत धुके पसरलेलं होतं. ते सावंतवाडीला अकरा वाजता पोहोचले तिथून दहा-बारा किलोमीटरवर गोव्याचा हायवे लागला. ह्या रस्त्यावर अनेक उताराचे टप्पे होते.

दुसऱ्या दिवशी अकरा वाजेपासून परत गोव्याची गर्मी जाणवायला लागली. आता त्यांचे शरीर साथ देत नव्हते पण मनाने ते खंबीर होते. वेग जरी कमी झाला तरी हरकत नाही पण सतत सायकल चालवत राहणे त्यांनी चालू ठेवले. शेवटी पणजीच्या पुढे फ्लाय ओव्हरचे काम चालू असल्यामुळे खूप मोठा तीन ते चार किलोमीटरचा ट्रॅफिक जॅम लागला. आम्ही क्रू मेंबर्सने त्यांना खायला प्यायला काही गोष्टी देऊन तेथून रवाना केले. कारण थांबून राहिले असते तर वेळेत रेस पूर्ण करणे अशक्य होते.

शेवटी अथक प्रयत्नांती 34 तासाला आठ मिनिटे कमी असताना दुपारी चारच्या दरम्यान मोहिंदर सर हे बागमलो बीचवर फिनिश पॉइंट येथे पोहोचले. रेस संपल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले सगळेच क्रू मेंबर्स, त्यांचे सोशल मीडियावरचे चाहते त्यांना फॉलो करत होते.

या माध्यमातून त्यांनी आपल्या समाजाला एक बोध दिलेला आहे की, आपण कधीच प्रयत्न करणं थांबवायला नको आणि जसं म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर असं केल्याने त्यांचे आरोग्य स्वास्थ चांगलं राहील आणि आपलं आयुष्य निरोगी आणि सुदृढ राहील. मोहिंदर सिंग भरज यांच्या मोहिमे दरम्यान त्यांना क्रू मेंबर म्हणून डॉ. महेंद्र महाजन, किशोर काळे आणि सागर बोंदाडे यांची मोलाची साथ लाभली.

व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा

https://youtu.be/X-vWdwv3mp8

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!