अग्निपथ योजनेला विरोध; रेल्वे मालमत्तेचे 500 कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान

नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :- अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनात रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 500 कोटींहून अधिक रेल्वे मालमत्तांचे नुकसान झाले असून उर्वरित रकमेचाही अंदाज लावला जात आहे. देशभरातील रेल्वे गाड्यांना लागलेल्या आगीमुळे जवळपास 100 डब्यांचे नुकसान झाले आहे.

एका रेल्वे डब्याची किंमत दोन करोड इतकी असते. म्हणजेच जवळपास 200 कोटी रुपयांचे रेल्वे कोच जळाले आहेत. याशिवाय 7 इंजिनही आंदोलकांनी जाळले आहेत. रेल्वेच्या एका इंजिनची किंमत 15 कोटी रूपये असते. यानुसार जवळपास 105 कोटी रुपयांच्या इंजिनचे नुकसान झाले आहे. याशिवाय रेल्वे ट्रॅक आणि स्टेशनवर झालेल्या नुकसानीचा अंदाज लावला जात आहे. यात सर्वाधिक नुकसान बिहारमध्ये झाले असल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय अनेक स्थानकांवर असलेल्या सिग्नल यंत्रणा, ऑपरेशनल उपकरणे, प्रवाशांच्या सुविधांशी संबंधित सामान इत्यादींसारख्या रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. रेल्वे त्याचे मूल्यांकन आणि मूल्यमापन करत आहे. रेल्वे प्रशासन आता सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतरच गाड्या चालवण्यास सुरुवात करेल.
प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेने सर्व प्रमुख स्थानकांवर हेल्पलाइन क्रमांक स्थापित केले आहेत. स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी वाणिज्य विभाग आणि रेल्वे संरक्षण दलाच्या कर्मचार्‍यांची नियुक्ती करून शक्य ती सर्व मदत करण्यात आली. इच्छुक प्रवाशांना तिकिटांचा परतावा प्राधान्याने सुनिश्‍चित केला जात आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त तिकीट काउंटरही उघडण्यात आले आहेत. परताव्यावर रद्दीकरण शुल्क आकारले जात नाही.

ट्रेन रद्द करणे, शॉर्ट टर्मिनेशन इत्यादीशी संबंधित सर्व अपडेटेड माहिती ट्विटर, फेसबुक आणि कु सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे. स्टेशनवर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्‍चित करण्यात आली आहे. प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक ठिकाणी तिकीट तपासणी कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!