खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ

मुंबई : खासदार नवनीत कौर राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्या विरोधामध्ये शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून पुन्हा वॉरंट जारी करण्यात आले आहे. या दोघांविरोधामध्ये दोन महिन्यात दोन वेळा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

दरम्यान, बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधामध्ये मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणामध्ये न्यायालयाने ६ सप्टेंबरच्या सुनावणीमध्ये राणा आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या हजेरीमधून सूट देण्याच्या अर्जास परवानगी दिली होती. मात्र गुरुवार (दि. २२) सप्टेंबरच्या सुनावणीमध्ये दोन्ही आरोपी पुन्हा गैरहजर राहिले होते. राणा यांच्या वडिलांनी पुन्हा हजेरीमधून सूट आणि आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला स्थगितीसाठी अर्ज केले होते. परंतु, दोन्ही अर्ज फेटाळत न्यायालयाने दोघांविरोधात पुन्हा अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.  त्यामुळे पुढच्या सुनावणीला दोघांना पुन्हा न्यायालयामध्ये हजर राहावे लागले अथवा सत्र न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.

काय आहे नेमके प्रकरण :

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे मुंबई हायकोर्टाने जातप्रमाणपत्र ८ जून २०२१ रोजी रद्द केले आहे. याचबरोबर त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. हायकोर्टाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका २०१७ मध्ये उच्च न्यायालयामध्ये दाखल केल्या होत्या.

नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रामध्ये अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यानंतर हायकोर्टाने निर्णय देत जातप्रमाणपत्र रद्द केले. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. २२ जून २०२१ रोजी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दिलासा देत जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!