मुंबई :– खा. संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज सकाळी 9:30 वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी घेऊन जाणार असून सकाळी 11:30 वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

काल सकाळी सात वाजेपासून ईडीचे पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होते. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा अटक करण्यात आली.

संजय राऊत यांना नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले. राऊत यांच्या घरी काल सकाळीच ईडीचे (ED) पथक दाखल झाले होते. त्यानंतर संजय राऊत यांची नऊ तास चौकशी करण्यात आली. दुपारी चार वाजण्याच्या आसपास त्यांना ईडीने ताब्यात घेतले. अधिक चौकशीसाठी संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर सव्वा सहा वाजण्याच्या दरम्यान 11 लाख 50 हजार रूपयांची रोकड संजय राऊतांच्या घरातून जप्त करण्यात आली.
याबरोबरच व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आलं. आज कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना जामिन मिळतो की कोठडी याकडे लक्ष लागून आहे.
ईडीकडून केले गेलेले आरोप खोटे असल्याचे सुनिल राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही घाबरणार नाही. भाजप संजय राऊत यांना घाबरली आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
दुसरीकडे संजय राऊत यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्ना पाटकर यांनी काल वाकोला पोलीस ठाण्यात जावाब नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. स्वप्ना पाटकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती अशा प्रकारची लेखी तक्रार पोलिसांना दिली होती.