कर बुडविणार्‍यांविरोधात मनपा अ‍ॅक्शन मोडवर; अवैध मिळकतींविरोधात उद्यापासून राबवणार मोहिम

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक महानगरपालिकेचे मुख्य उत्पन्‍न असलेल्या घरपट्टी व पाणीपट्टीच्या वसुलीसाठी महापालिकेच्या अवैधरीत्या असलेल्या मिळकतींवर लक्ष केंद्रित केले असून, उद्यापासून खास अवैध बांधकामांचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

नाशिक महानगरपालिकेतर्फे शहरात अवैध बांधकाम, मिळकतीच्या वापरात बदल, मिळकतींचा अवैध वापर, अनधिकृत नळजोडणी आदी बाबींची तपासणी या मोहिमेत होणार आहे. २६ ते २९ जानेवारी दरम्यान मनपाची ३१ पथकांद्वारे ही शोधमोहीम असणार आहे. या मोहिमेच्या संदर्भात आयुक्‍त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत आयुक्‍तांनी सांगितले की, ही मोहीम खास करून नागरिकांविरुद्ध नसल्याची जनजागृती करण्याची सूचना केली. नागरिकांऐवजी महापालिकेचे कर बुडविणार्‍यांविरोधात असल्याचे सांगितले.

शहरातील सोसायटी, अपार्टमेंट, कमर्शिअल कॉम्प्लेक्स, रो हाउस, बंगलो, शैक्षणिक, औद्योगिक मिळकत, निव्वळ हॉटेल व्यवसाय, लॉजिंग व हॉटेल व्यवसाय, लॉजिंग व्यवसाय, हॉस्पिटल व्यवसाय, मॉल, मोबाइल टॉवर मिळकत, थिएटर-नाट्यगृह मिळकत, सामाजिक संस्था मिळकत आदी ठिकाणी सर्व्हे केला जाणार आहे. अनेक ठिकाणी पार्किंगमध्ये अनधिकृत हॉटेल, दुकाने असतात. निवासी मिळकतीचा वापर व्यवसायासाठी करतात, अशी सगळी ठिकाणे शोधून त्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

करवसुली केली जाणार आहे. नळकनेक्शनही तपासली जाणार आहेत. पाणीचोरी शोधून काढली जाणार आहे. पाणीपट्टी, घरपट्टी थकबाकीदार असलेल्यांचे नळकनेक्शन कट करण्याची मोहीम कडक केली जाणार आहे. कर, बांधकाम, नगर नियोजन, अतिक्रमण असे चारही विभाग मिळून शोधमोहीम राबविणार आहेत. थकबाकीदार असतील त्यांच्यावर कायदेशीर लिलाव प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यापुढे मनपाच्या पोर्टलवर किंवा ई-कनेक्ट अ‍ॅपवर तक्रार करणार्‍या नागरिकास थकबाकीदार नसल्याचा पुरावा देण्याची सक्‍ती करावी, अशी सूचना बैठकीत पुढे आली आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

या बैठकीसाठी अतिरिक्‍त आयुक्‍त प्रदीप चौधरी, कर विभागाच्या उपायुक्‍त अर्चना तांबे, उपायुक्‍त डॉ. विजयकुमार मुंढे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उपायुक्‍त नितीन नेर, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, सचिन जाधव आणि सहा विभागीय अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!