नाशिक (प्रतिनिधी) :- चुंचाळे शिवारात धारदार शस्त्राने महिलेचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चुंचाळे वरचे येथे दत्तनगर भागात संगीता सचिन पवार (वय 22, मुळ राहणार वाळुंज एमआयडीसी, औरंगाबाद, हल्ली रा. चुंचाळे) या आपल्या पती व 2 वर्षांच्या मुलीसह नुकत्याच रहायला आल्या होत्या. काल दुपारनंतर व आज पहाटेच्या दरम्यान अज्ञाताने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
या घटनेची माहिती संगीता पवार यांचे पती सचिन पवार यांनी औरंगाबाद येथील नियंत्रण कक्षाला कळविली. औरंगाबाद पोलिसांनी वरील माहिती नाशिक येथील अंबड पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटना समजताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत तिचा मृतदेह ताब्यात घेतला. या खून प्रकरणी चौकशीसाठी अंबड पोलीस पती सचिन पवारला ताब्यात घेण्यासाठी औरंगाबादला रवाना झाले आहेेत. खून नक्की कोणी व का केला याचा शोध पोलीस घेत आहेत.