नाशिक (प्रतिनिधी) :- अंबडलिंक रोडवरील संजीवनगर भागात काल एका युवकावर झालेल्या हल्ल्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत परिसरात दुसरी खूनाची घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आलम शब्बीर शेख (वय 19, रा. बिहार)या युवकावर धारदार शस्त्राने वर करून हल्लेखोर पसार झाला. या हल्ल्यात आलम गंभीररीत्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान रात्री 12 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजीव नगर भागात जत्रा सुरू आहे. या जत्रेच्या पाठीमागील भागात असलेल्या मोकळ्या मैदानात आलम यास अज्ञात व्यक्तीने अडवून धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात आलम कोसळला. माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, नंदन बगाडे व गस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, हल्ला कोणी व का केला? हे उशिरापर्यंत समजू शकलेले नव्हते. पोलीस याबाबत शोध घेत आहेत. अंबड पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.