मुलाच्या दारूच्या सवयीला कंटाळून मारहाणीत वडिलांकडून मुलाचा खून

नाशिक (प्रतिनिधी) :- मुलाच्या दारूच्या सवयीला कंटाळून वादातून झालेल्या मारहाणीत वडिलांनी मुलाचा खून केल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कारभारी रावबा ठोके (वय 60, रा. पाटे शिवार) हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. रविवार सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास कारभारी ठोके यांचा मुलगा रवींद्र हा दारू पिऊन घरी आला होता. घरी येताच त्याने “माझे लग्न करून देणार की नाही?” अशी विचारणा वडिलांना केली. त्यावर कारभारी ठोके यांनी “तू पहिले दारू बंद कर,” असे सांगितले. या गोष्टीचा रवींद्रला राग आल्याने त्याने त्वरित “मी दारू बंद करणार नाही,” असे वडिलांना सांगत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

कारभारी ठोके यांना राग अनावर झाल्याने घरातील कोपर्‍यात ठेवलेली लोखंडी पहार त्यांनी रवींद्रच्या डोक्यात, हातापायावर मारून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात रवींद्रचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रकाश कारभारी ठोके यांच्या फिर्यादीवरून कारभारी ठोकेविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक बारवकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!