नाशिक प्रतिनिधी : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून व तोंडावर दगडी पाटा मारून पत्नीला जिवे ठार मारणार्या सागर गणपत पारधी (रा. मुंजोबा गल्ली, फुलेनगर, पंचवटी) या आरोपीस न्यायालयाने जन्मठेपेसह 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
ही घटना गेल्या 18 जुलै 2020 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याबाबतचे वृत्त समजताच पोलिसांनी धाव घेऊन तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एस. शिंदे व कॉन्स्टेबल श्रीकांत कर्पे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून गुन्हा शाबित होण्याच्या दृष्टीने तपास केला. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 6 चे न्या. आर. आर. राठी यांच्यासमोर चालला. न्यायमूर्तींनी आरोपीस भा. दं. वि. कलम 302 अन्वये जन्मठेप व 25 हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली.
या प्रकरणी सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. योगेश डी. कापसे व अॅड. रेश्मा जाधव यांनी काम पाहिले. आरोपीस शिक्षा झाल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एस. शिंदे व कॉन्स्टेबल श्रीकांत कर्पे, तसेच पैरवी अधिकार्यांचे अभिनंदन केले आहे.