म्हसरूळला तरुणाची हत्या

नाशिक (प्रतिनिधी) :– दोन गटांतील वाद मिटविण्यासाठी गेलेल्या युवकाच्या पोटात चॉपरने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना म्हसरूळ परिसरात घडली. या घटनेनंतर हल्‍लेखोर पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. यश रामचंद्र गांगुर्डे असे या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, की म्हसरूळ परिसरातील आकाश पेट्रोल पंपाजवळील सावरकरनगर गार्डनजवळ काल रात्री दोन गटांमध्ये वाद सुरू होता. दोेन्ही गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. यादरम्यान एकाने यश रामचंद्र गांगुर्डे (वय 24, रा. म्हसरूळ) याला तेथे बोलावले. त्यानंतर यश गांगुर्डेने तेथे येऊन दोन्ही गटांत सुरू असलेला वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तेथे असलेल्या चार जणांपैकी एकाने यश गांगुर्डे हा वाद सोडवीत असताना त्याच्या पोटात चॉपरने वार केला. यामध्ये यश हा रक्‍तबंबाळ झाला. यावेळी त्याच्याबरोबर असलेला एक जण हत्येचा प्रकार घडताच पळून गेला. जखमी अवस्थेत असलेल्या यशला रुग्णालयात औषधोपचारासाठी नेले असता अतिरक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले.

ही हत्या काल रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्‍त संजय बारकुंड, अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्‍त मधुकर गावित, वसंत मोरे, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे, गुन्हे शाखा युनिट-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, गुन्हे शाखा युनिट-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल आदींनी घटनास्थळी दाखल होऊन तपासाच्या दृष्टीने पोलिसांना सूचना केल्या.

दरम्यान, याबाबत विकास रामचंद्र गांगुर्डे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात हल्‍लेखोरांविरुद्ध फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!