दांडिया खेळण्याच्या कारणावरून नाशिकरोडला धारदार शस्त्राने युवकाचा खून

 

नाशिकरोड (प्रतिनिधी):- दसरा सणाच्या पूर्वसंध्येला माजी नगरसेवकाच्या मंडळात दांडिया खेळत असतांना झालेल्या किरकोळ वादामुळे युवकावर हल्ला करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात घबराट पसरली असून उपनगर पोलिसांनी अवघ्या काही तास संशयित जेरबंद केले.

नवरात्री उत्सवानिमित्त नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या शिवाजीनगर परिसरात दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक मुले-मुली, महिला पुरूष यांनी सहभाग घेतला होता. समतानागर येथे राहणारा कमल उर्फ बाबू लोट (वय १९) हा खेळण्याचा आनंद घेत होता.

कमल (बाबू) लोट व इतर चार ते पाच कार्यकर्त्या ंमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसान शिवीगाळ व हाणामारीत झाले व त्यानंतर संतप्त झालेल्या मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राच्या सहाय्याने बाबू लोट याच्यावर गंभीर हल्ला करून त्याला जखमी केले. दरम्यान या घटनेनंतर दांडिया खेळणाऱ्या मध्ये घबराट निर्माण झाली व कार्यकर्ते इकडून तिकडे पळू लागले तर जखमी झालेल्या लोट याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर उपनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही घटना समजताच पोलीस उपायुक्त विजय खरात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!