मुंबई : वाद्यवादक आणि संगीतकार निर्मल मुखर्जी यांचे निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मुखर्जी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. मुंबईतील साकीनाक्याजवळील स्मशानभूमीत निर्मल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राजेश रोशन, पंचमदा, कल्याणजी-आनंदजी तसेच अनू मलिक, जतिन-ललित ते थेट विशाल-शेखर या संगीतकारांच्या गीतांमध्ये त्यांनी बोंगो, कोंगो, तुंबा, दरबुका, डी-जेंबे अशा वाद्यांचे वादन केली आहेत. हिंदी, बंगाली भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच पण ते मराठी आणि विशेषतः मालवणी भाषेत गप्पा मारत असत. “अशी चिकमोत्याची माळ” हे अप्रतिम गणेशगीत त्यांनी अरविंद हळदीपूर यांच्यासोबतीने संगीतबद्ध केले होते. निर्मल मुखर्जी यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

निर्मल मुखर्जी हे अरविंदजी हळदीपूर यांच्यासह “अरविंद-निर्मल” या नावाने संगीत देत असत. ‘झाले मोकळे आकाश’ या चित्रपटालादेखील या जोडीने संगीत दिले होते. संगीतकार राजेश रोशनजींच्या टीममध्ये ते नेहमीच असत. वाद्य संयोजक म्हणून अनेक गाण्यात त्यांचे योगदान आहे. त्यांचे ‘गणपती आले माझे घरा’ या कॅसेटमधील ‘अशी चिकमोत्याची माळ…’ हे गाणे तूफान गाजले. अरविंद-निर्मल या जोडीने ‘ग गणपतीचा…’ आणि ‘आले देवाचे देव गणराज…’ हे अल्बमही केले.
निर्मल यांनी वयाच्या दहाव्या वर्षी संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले. मुंबईमधील दादर येथे त्यांचा म्युझिक हॉल होता. निर्मल यांना विविध वाद्ये शिकण्याची आवड होती. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, गायिका आशा भोसले यांच्या एका शोसाठी ते दुबईमध्ये गेले होते. त्याठिकाणी तेथे असणाऱ्या लेबानिझ नर्तिका आणि वादकांकडे त्यांनी दरबुका हे वाद्य पाहिले. त्यानंतर निर्मल मुखर्जी यांनी त्या वाद्याचे निरीक्षण केले. त्यानंतर ते त्यामध्ये पारंगत झाले होते.
अनेक पुरस्कारांनी सन्मान
निर्मल मुखर्जी यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कारासोबतच अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या ‘एक होती वादी’ या चित्रपटासाठी बरेच पुरस्कार मिळाले.