धनादेश अनादर प्रकरणी भाजप पदाधिकार्‍याला 11 वर्षांनंतर तुरुंगवास

नागपुर :- धनादेशाच्या अनादर प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी भाजपच्या पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संजय अवचट आणि दुसरा आरोपी भरत पटेल यांना 6 महिने तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स’ कायद्याच्या कलम 138 अंतर्गत आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने संजय अवचट यांना एका महिन्यात पीडित मोहनलाल पटेल यांना 40 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भरत पटेल यांनाही एकूण 60 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. दंड न भरल्यास आणखी दोन महिने कारावास भोगावा लागणार आहे.

पीडित मोहनलाल पटेल यांची वाठोडा येथे जमीन होती. आरोपींनी मोहनलाल यांच्याकडून 1.70 कोटी रुपयांमध्ये ही जमीन खरेदी केली. त्यानंतर मोहनलाल यांना काही रक्कम दिली आणि उर्वरित रकमेचे तीन धनादेश दिले. आरोपींनी जमिनीची ‘पॉवर ऑफ अटर्नी’ घेतली. वाठोडा अग्निशमन केंद्रासाठी आरक्षित जमिनीतही या जमिनीचा समावेश होता.

याचा फायदा घेत आरोपींनी जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या बदल्यात त्यांनी नागपूर महापालिकेकडून ‘टीडीआर’ घेतला. परंतु, फेब्रुवारी 2011 मध्ये मोहनलाल यांना दिलेल्या धनादेशाचा अनादर झाला. त्यामुळे त्यांनी न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केले. तब्बल 11 वर्षांनंतर त्यांना या प्रकरणात न्याय मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!