नाशिकरोड (प्रतिनिधी):- चारचाकी गाड्यांची वाहतूक करणाऱ्या रेल्वे मालगाडीचे नांदगावजवळ काल मध्यरात्री रुळावरून चाके घसरल्याने अपघात झाला. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही; मात्र अनेक गाड्या उशिराने धावत होत्या.

या बाबत रेल्वे प्रशासनाने कळवले की, भुसावळकडून मनमाडकडे जाणाऱ्या मालगाडीला अपघात झाला. शनिवारी मध्यरात्री नांदगाव स्थानकाजवळ एन एम जी वॅगन या मालगाडीचे इंजिनपासून दुसऱ्या बोगीचे चार चाके रुळावरून घसरून अपघात झाला. मोठा आवाज झाल्याने रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ मदतकार्याला सुरुवात करण्यात आली.

या अपघातामुळे भुसावळ कडून मुबंई कडे जाणाऱ्या 11034 दरभंगा पुणे एक्स्प्रेस, 12618निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस,12112 अमरावती-मुबंई एक्स्प्रेस,12810 हावडा-मुबंई मेल,12106गोडीया-मुबंई पंजाब मेल,12136नागपूर-पुणे या गाड्या एक ते दोन तास उशिराने धावत होत्या.पहाटे तीन वाजेला वाहतूक सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.