मुंबई :- काही दिवसांत होणाऱ्या बीएमसी निवडणुकीपूर्वी मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय संघर्ष सुरु असून रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार असून बंगल्याची तपासणी करण्यासाठी महापालिकेने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे वाद रंगण्याची शक्यता आहे. यावरुन आता राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. विनायक राऊत हे घडल्यावर आपले ‘बॉस ‘ आणि आपण कुठे धावणार ? असा इशारा राणे यांनी दिला आहे.

मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. त्यानंतर आज नारायण राणे यांनी ट्विट करत शिवसेनेच्या नेत्यांच्या घरी ईडीची धाड पडणार असल्याचा इशारा दिला आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन यांचाही उल्लेख केला. नारायण राणे यांनी ट्विटमध्ये सुशांतसिंह आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. तसेच दिशा सालियनवर सामुहिक बलात्कार झाल्याचा आरोपही राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे.
https://twitter.com/MeNarayanRane/status/1494641777831079940?t=RjxkiiDFR2oTgA9sOYnOrw&s=19
मातोश्रीमधील चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले, असे नारायण राणे यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे. हे ट्विट राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासाठी ‘महत्वाची बातमी’ असे म्हणत केले आहे. तसेच ईडीची नोटीस आल्यावर विनायक राऊत आपले ‘बॉस ‘ आणि आपण कुठे धावणार? असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला आहे.