नाशिक बार असोसिएशनने नोंदणी महानिरीक्षकांकडे केल्या “या” मागण्या

नाशिक (प्रतिनिधी):- दुय्यम निबंधक दर्जाचे आणखी चार कार्यालय सुरू करावे व नाशिक बार असोसिएशनला ई- रजिस्ट्रेशनचा परवाना मिळावा आदी विविध मागण्यांसाठी नोंदणी महानिरीक्षक श्रावण हार्डीकर यांची नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे व पदाधिकार्‍यांनी सह जिल्हा निबंधक कार्यालय, कांदा बटाटा भवन, द्वारका येथे भेट घेतली.

यावेळी दस्त नोंदणीसाठी येणार्‍या अडचणीबाबत चर्चा केली. त्यात प्रामुख्याने सर्व्हर पूर्ण क्षमतेने व सुरळीत चालणे, नासिक मनपा हद्दीत आणखी 4 दुय्यम निबंधक कार्यालये सुरू करणे व नाशिक बार असोसिएशनला ई- रजिस्ट्रेशनचा परवाना मिळणे या विषयांवर चर्चा झाली. त्याप्रमाणे सर्व्हर सुरळीतपणे पूर्ण क्षमतेने चालू होण्यासंदर्भात युद्धपातळीवर प्रयत्न चालू असून येत्या 2 महिन्यात सर्व्हर सुरळीतपणे चालू होईल तसेच मनपा हद्दीतील 2 कार्यालये सकाळ संध्याकाळ शिफ्टमध्ये चालू करण्याचा निर्णय लगेच घेतला जाईल आणि नाशिक बार असोसिएशनला ई-रजिस्ट्रेशन परवाना देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे हार्डीकर यांनी सांगितले. यावेळी या मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.

यावेळी सह जिल्हा निबंधक कैलास दवंगे, नाशिक बार असोसिएशनचे उपाध्यक्ष वैभव शेटे, सचिव हेमंत गायकवाड, सहसचिव संजय गिते, खजिनदार कमलेश पाळेकर, सदस्य शिवाजी शेळके, प्रतिक शिंदे, महेश यादव आणि वैभव घुमरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!