नाशिक (प्रतिनिधी) :- गेली नऊ वर्षे नाशिकचे शहराध्यक्षपद भूषविणारे काँग्रेस नेते शरद आहेर यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे; मात्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी कायम आहे, अशी माहिती त्यांनी दिली, तसेच नाशिक जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपद व इतर रिक्त पदांवर लवकरच नियुक्त्या केल्या जातील, असे त्यांनी सूचित केले.

शरद आहेर यांच्या राजीनाम्याचे वृत्त नाशिकमध्ये येताच राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती; मात्र शरद आहेर यांनी स्पष्ट केले, की ना. बाळासाहेब थोरात व मान्यवरांच्या उपस्थितीत शिर्डी येथे सुरू असलेल्या काँग्रेस पदाधिकार्यांच्या अधिवेशनात पक्षाच्या ‘एक व्यक्ती-एक पद’ या धोरणानुसार आपण आपला शहराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे; मात्र प्रदेश उपाध्यक्षपदी आपली नियुक्ती कायम आहे.
आगामी निवडणुका लक्षात घेऊन सध्या सुरू असलेल्या अधिवेशनानंतर अल्पावधीतच नाशिक जिल्हा महिला जिल्हाध्यक्षपद व इतर रिक्त पदांवर योग्य कार्यकर्त्यांची निवड घोषित होण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.