नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट 1 कडून तब्बल 6 लाखांच्या 14 मोटारसायकली हस्तगत

नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक शहर व परिसरात मोटारसायकल व दुचाकीचोरीचे गुन्हे शहर शाखेला मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर परिसरातील चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सहा लाख रुपये किमतीच्या 14 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सर्व आरोपी सुशिक्षित असून, मौजमजेसाठी नाशिकची वाहने चोरून अमळनेर परिसरात विकत असल्याचे दिसून आले आहे.

याबाबत माहिती अशी, की मोटारसायकलचोर्‍यांचा तपास करीत असताना दि. 14 जुलै रोजी गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार प्रवीण वाघमारे यांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार शहर परिसरातून वाहने चोरणारे चोरटे अमळनेर (जि. जळगाव) येथे राहत असल्याचे समजले. ही माहिती त्यांनी वरिष्ठांना देताच गुन्हे शाखा युनिट-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी उपनिरीक्षक विष्णू उगले, अंमलदार रवींद्र बागूल, प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, आसिफ तांबोळी, विशाल देवरे आदींचे पथक अमळनेर येथे रवाना केले.

या पथकाने प्रथम अमोल दशरथ पाटील (वय 23) आणि विशाल अधिकार पाटील (वय 22, दोघेही रा. मांडळ, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्यांना नाशिक येथे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 मध्ये आणून अधिक चौकशी केली. यावेळी त्यांनी त्यांचे साथीदार दिनेश सुनील पाटील (रा. आनोरी) आणि मल्हार पाटील (रा. सबगव्हाण, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांची नावे सांगितली. पोलिसांनी या चौघांनाही अटक केली असून, त्यांच्याकडून सहा लाख रुपये किमतीच्या विविध ठिकाणांहून चोरलेल्या 14 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पुढील तपास गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू उगले हे करीत आहेत.

या आरोंपींकडून सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेले दोन गुन्हे, तर सातपूर पोलीस ठाण्यात नोंद झालेले सहा गुन्हे उघडकीस आले आहेत, तसेच मध्य प्रदेशातील बडवाह पोलीस ठाण्याच्या आणि अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या तीन मोटारसायकलींचा समावेश आहे. त्याचबरोबर जप्त केलेल्या तीन मोटारसायकलींच्या चोरीची कोणत्या पोलीस ठाण्यात नोंद आहे, याबाबत तपास सुरू आहे. सर्व आरोपी उच्चशिक्षित असून, मुख्यत: सातपूर येथील विविध कंपन्यांच्या पार्किंगमधून मौजमजेसाठी मोटारसायकली चोरून अमळनेर भागात विकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संजय बारकुंड, पोलीस उपायुक्त वसंत मोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, उपनिरीक्षक विष्णू उगले, अंमलदार रवींद्र बागूल, येवाजी महाले, प्रदीप म्हसदे, आसिफ तांबोळी, शरद सोनवणे, प्रवीण वाघमारे, मोतीराम चव्हाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, अण्णासाहेब गुंजाळ आदींच्या पथकाने यशस्वी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!