नाशिक (प्रतिनिधी) :– सुमारे एक आठवड्यापूर्वी अटक केलेल्या आरोपीने अधिक चौकशीत शहर गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाला आणखी एका घरफोडीची कबुली दिली असून, पोलिसांनी एकूण 16 लाख 15 हजार 547 रुपये किमतीची सोन्याची लगड आणि 1 लाख 70 हजार 757 रुपये किमतीची 4 किलो वजनाची चांदीची लगड आरोपी व त्यांच्या साथीदारांकडून जप्त केली आहे.

याबाबत माहिती अशी, की नाशिकरोड परिसरातील एका दरोड्याचा तपास करीत असताना दि. 16 रोजी रोहन संजय भोळे (वय 35, रा. जयप्रकाश सोसायटी, विद्यानगरी, नाशिकरोड) व हृषिकेश मधुकर काळे (वय 26, रा. गंधर्वनगरी, पद्मिनी सोसायटी, नाशिकरोड) या दोघांना सापळा रचून अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडून 32 लाख 38 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यावेळी जप्त केला होता. कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी दिली होती. या कालावधीत केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी मे महिन्यात जय भवानी रोड येथे दिवसभर पाळत ठेवून रात्रीच्या वेळी धाडसी चोरी केल्याचे कबूल केले होते. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात सोहनलाल रामानंद शर्मा (रा. औटे मळा, जय भवानी रोड, नाशिकरोड) यांनी तक्रार दिली होती.

अटक केलेल्या रोहन संजय भोळे या आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने सदरचे दागिने तुषार रामचंद्र शहाणे (रा. नारायण बापूनगर, जेलरोड) या ओळखीच्या सोनाराकडे दिल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांनी लिंक लावत शहाणे यास ताब्यात घेतले असता त्याने सदरचे दागिने सराफ बाजारातील श्री लक्ष्मी केदार ज्वेलर्स यांना विकल्याचे सांगितले.
पोलिसांनी लक्ष्मी केदार ज्वेलर्सचे मालक राजेंद्र ज्योतिबा घाडगे यांची चौकशी केली असता त्यांनी शहाणे हा गेल्या 15 वर्षांपासून सोने-चांदी खरेदी-विक्रीसाठी येत असतो, असे सांगितले. घाडगे यांनी आलेल्या दागिन्यांचे सोने वितळवून त्याची लगड केली होती. त्यानुसार 16 लाख 15 हजार 547 रुपयांची 385.310 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड आणि 1 लाख 70 हजार 757 रुपये किमतीची चार किलोची चांदीची लगड असा 17 लाख 86 हजार 304 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला.
पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, उपनिरीक्षक पोपट कारवाळ, राजेंद्र जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक बेंडकोळी, हवालदार प्रकाश भालेराव, शंकर काळे, देवकिसन गायकर, सुगन साबरे, अनिल लोंढे, नंदकुमार नांदुर्डीकर, गुलाब सोनार, प्रकाश बोडके, राजेंद्र घुमरे, संपत सानप, संजय सानप, संदीप रामराजे, सोमनाथ शार्दूल, सुनील आहेर, विवेक पाठक, राजाराम वाघ, बाळू शेळके, पोलीस नाईक परमेश्वर दराडे, प्रशांत वालझाडे, चंद्रकांत गवळी, विजय वरंदळ, यादव डंबाळे, राहुल पालखेडे, चालक हवालदार मधुकर साबळे, संतोष ठाकूर, अतुल पाटील आदींच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.
आरोपींकडून यापूर्वीच 32 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल व गुन्हे करण्यासाठी वापरलेली तीन वाहने असा 50 लाख 4 हजार 804 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पोपट कारवाळ हे करीत आहेत.