नाशिक (प्रतिनिधी) :- जय भवानी रोड, नाशिकरोड येथील एका बंगल्यात घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणार्या दोघा अट्टल घरफोड्यांना गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून सोन्याचांदीचे दागिने, दोन कार्स, एक मोपेड व महागडे मोबाईल फोन असा 32 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना कोर्टासमोर उभे केले असता दि. 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत माहिती अशी, की जय भवानी रोड, नाशिकरोड येथील अश्विन हौसिंग सोसायटीत संजय ईश्वरलाल बोरा यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी दि. 10 जुलै रोजी घरफोडी करून लाखो रुपयांची सोनेचांदी व इतर ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट-2 चे हवालदार प्रकाश भालेराव यांना गुप्त खबर्याकडून एका रिट्झ कारमधून दोन इसम मोटवानी रोड, दत्तमंदिर भागात संशयास्पदरीत्या फिरत आहेत, अशी खबर मिळाली. ही माहिती त्यांनी वरिष्ठांना देताच पोलीस निरीक्षक आनंद वाघ, उपनिरीक्षक पोपट कारवाळ, हवालदार प्रकाश भालेराव, शंकर काळे, देवकिसन गायकर, सुगन साबरे, अनिल लोंढे, नंदकुमार नांदुर्डीकर, गुलाब सोनार, प्रकाश बोडके, पोलीस नाईक परमेश्वर दराडे यांनी मोटवानी रोडवर उत्सव मंगल कार्यालयासमोर दि. 16 जुलै रोजी सापळा रचला.

यावेळी संशयित रिट्झ कार येताना दिसली. ही कार अडवून गाडीत बसलेले रोहन संजय भोळे (वय 35, रा. जयप्रकाश सोसायटी, विद्यानगरी, नाशिकरोड) व ऋषिकेश मधुकर काळे (वय 26, रा. पद्मिनी सोसायटी, गंधर्वनगरी) यांची चौकशी केली असता त्यांनी प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना कार्यालयात आणून सखोल चौकशी केली असता त्यांनी सहा दिवसांपूर्वी जय भवानी रोडवरील ईश्वर बंगल्यात चोरी केल्याचे कबूल केले. याचबरोबर मे महिन्यात जय भवानी रोड येथे घरफोडी केल्याचेही कबूल केले. यामुळे एकाच तपासात दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता 21 लाख 68 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने, चार लाख रुपये किमतीची राखाडी रंगाची रिट्झ कार क्रमांक एमएच 03 बीई 848, पाच लाख रुपये किमतीची मारुती स्विफ्ट कार क्रमांक एमएच 15 जीएन 9142, तसेच 50 हजार रुपये किमतीची सुझुकी अॅक्सेस मोपेड क्रमांक एमएच 15 ईबी 3033 या वाहनांसह 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे दोन महागडे मोबाईल असा 32 लाख 38 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त केलेली सर्व वाहने आरोपींनी गुन्हेगारी कृत्ये करण्यासाठी वापरल्याचे दिसून आले.
पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद वाघ, उपनिरीक्षक पोपट कारवाळ, हवालदार प्रकाश भालेराव, शंकर काळे, देवकिसन गायकर, सुगन साबरे, अनिल लोंढे, नंदकुमार नांदुर्डीकर, गुलाब सोनार, प्रकाश बोडके, संपत सानप, संजय सानप, संदीप रामराजे, सोमनाथ शार्दूल, सुनील आहेर, पोलीस नाईक परमेश्वर दराडे, प्रशांत वालझाडे, चंद्रकांत गवळी, विजय वरंदळ, यादव डंबाळे, राहुल पालखेडे, चालक हवालदार मधुकर साबळे, संतोष ठाकूर व अतुल पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.