नाशिक (प्रतिनिधी) :- महापालिकेच्या वाहनातून घरी सोडण्यास नकार देणार्या जीपचालकास सात मद्यपींनी मारहाण करून त्याच्या खिशातील पैसे काढून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विजय चिंधू दरेकर (वय 44, रा. कामगारनगर, सातपूर) हे मनपात जीपचालक आहेत. गेल्या दि. 2 एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता दरेकर हे एमएच 15 एए 2121 या क्रमांकाचे मनपाचे वाहन बोलेरो जीप घेऊन जात होते. त्यावेळी सातपूर येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर ते आले असता आरोपी महेश दैत्यकर (वय 35, रा. कामगारनगर, सातपूर) याने आवाज देऊन त्यांना थांबविले.

त्यावेळी दैत्यकर याच्यासोबत आरोपी विकी अहिरे (वय 28, रा. वैभव पार्क, कामगारनगर), विवेक निकम (वय 30, रा. स्वाध्याय केंद्राजवळ, कामगारनगर, सातपूर), योगेश देशमुख (वय 30, रा. शिवाजी चौक, कामगारनगर, सातपूर), शरद रोकडे (वय 35, रा. चांदशी, ता. जि. नाशिक) व इतर दोन अनोळखी व्यक्ती तेथे उभ्या होत्या. ते सर्व जण दारू प्यालेले होते. त्यावेळी दैत्यकर याने दरेकर यांना “आम्हाला घरी सोड,” असे सांगितले; मात्र “हे सरकारी वाहन असल्यामुळे तुम्हाला वाहनातून घरी सोडता येणार नाही,” असे सांगितले.
याचा राग आल्यामुळे या सातही जणांनी चालकास धक्काबुक्की करून त्याच्या खिशातून दोन हजार रुपये काढले, तर महेश दैत्यकर याने चालकाच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने ओढून घेतली, तसेच “तुझ्या घरात घुसून अजून पैसे घेईन,” असा दम दिला. या झटापटीत जीपचालक दरेकर यांचा 52 हजारांचा ऐवज गहाळ झाला. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये सातपूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.