नाशिक (प्रतिनिधी) :- लग्न चांगले केले नाही, तसेच टीव्ही व फर्निचर दिले नाही म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की फिर्यादी महिला ही दि. 17 मे 2017 ते दि. 12 मे 2020 या कालावधीत सासरी नांदावयास होती. फिर्यादी महिला व आरोपी पती यांचा साखरपुडा सिन्नर येथे झाला. साखरपुडा व लग्नाचा खर्च विवाहितेच्या आईवडिलांनी केला. लग्नात विवाहितेच्या पतीला सोन्याचे दागिने, संसारोपयोगी साहित्य दिले; मात्र सासरी आल्यानंतर फिर्यादी विवाहितेला काही दिवस चांगले नांदविले. त्यानंतर छोट्या-मोठ्या कारणांवरून पती, सासू, सासरे, दीर हे संगनमत करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. “तुझ्या आईवडिलांनी लग्न चांगले केले नाही. टीव्ही व फर्निचर दिले नाही,” असे म्हणून त्रास दिला.
पतीला दारूचे व्यसन असून, तो विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करीत असे. पतीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाल्याने त्या कारणावरून पतीने विवाहितेला मारहाण केली, तसेच साखरपुड्यात व लग्नात दिलेले स्त्रीधन तिच्या अंगावरून काढून घेत तिला माहेरून पैसे आणण्यासाठी दमदाटी केली. या छळाला कंटाळून विवाहितेने सातपूर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद करीत आहेत.