मिळकत परस्पर विकून 14 लाखांचा अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी) :- नाणेगाव येथील घराच्या विक्रीपोटी 14 लाख रुपये घेऊन ते घर परस्पर दुसर्‍याला विकून रकमेचा अपहार केला.

या प्रकरणी नाणेगाव येथील मच्छिंद्र हिरामण आडके आणि हिरामण दशरथ आडके या दोघांविरुद्ध कोर्टाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मच्छिंद्र आडके यांनी नाणेगाव येथील घर क्रमांक 1240 व 1241 हे घर त्यांनी स्वत:चे आहे, असे सांगून फिर्यादी संदीप माधवराव बेंद्रे (वय 40, रा. जाधव संकुल, पळसे) यांच्याकडून विक्रीपोटी 14 लाख रुपये घेतले होते; मात्र प्रत्यक्षात ही मिळकत त्यांनी हिरामण दशरथ आडके यांच्या नावावर केली.

फसवणूक झाल्यामुळे संदीप बेंद्रे हे पैसे परत मागण्यासाठी गेले असता त्यांना वाईटसाईट शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार दि. 22 जानेवारी 2016 ते दि. 7 जून 2021 दरम्यान घडला. त्यामुळे बेंद्रे यांनी अधीक्षक दिवाणी व फौजदारी न्यायालय यांच्या कोर्टात फौजदारी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार कोर्टाने फौजदारी प्रक्रिया संहिता 156 (3) प्रमाणे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भडांगे व अंमलदार आहेर यांनी आडके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!