नाशिक (प्रतिनिधी) :- एकट्या मुलीला रस्त्यात अडवून आडबाजूस नेऊन तिच्यावर जबरी लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की फिर्यादी यांची मुलगी घराकडे एकटी येत असताना आरोपी तरुणाने तिला रस्त्यात अडविले. त्यानंतर आडबाजूला नेऊन तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर “तुला वडील नाहीत. जर तू हा प्रकार तुझ्या आईला सांगितलास, तर तुला व तुझ्या आईला मारून टाकीन, तसेच पोलिसांना सांगितले, तर तुझ्या घरातील सर्वांना संपवून टाकीन,” अशी धमकी अत्याचार करणार्या तरुणाने या मुलीस दिली.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख करीत आहेत.