नाशिक (प्रतिनिधी) :– फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण करून महिलेला फसवून तिच्याशी लग्न करून लैंगिक अत्याचार करणार्या पतीसह सासूसासर्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिलेसोबत आरोपी विनोद वसंतराव ढाकणे याने फेसबुकच्या माध्यमातून ओळख करून तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर पूर्वी लग्न झालेल्या पत्नीसोबत वैवाहिक संबंध अस्तित्वात असतानाही ते लपवून ठेवले, तसेच विनोद ढाकणे (वय 45) याने ते संबंध लपवून ठेवत पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला आहे, असे पीडित महिलेच्या नातेवाईकांना भासवून त्यांच्या संमतीने विनोद ढाकणे, विजया वसंतराव ढाकणे (वय 64), वसंतराव कारभारी ढाकणे (वय 68, तिघेही रा. स्नेह संकुल, भाऊसाहेब हिरेनगर, नाशिक-पुणे रोड, नाशिक) यांनी संगनमत करून फिर्यादी महिलेशी लग्न लावून तिची फसवणूक केली, तसेच आरोपी विनोद ढाकणे याने पीडित महिला ही त्याची पत्नी नसल्याचे माहीत असतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करून वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला, तसेच पीडित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला.

हा प्रकार दि. 30 जानेवारी 2020 ते 21 मार्च 2021 यादरम्यानच्या कालावधीत भाऊसाहेब हिरेनगर येथे घडला. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नसतानाही आपल्याशी विवाह करून फसवणूक केल्याची बाब लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात विनोद ढाकणे, विजया ढाकणे व वसंतराव ढाकणे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिते करीत आहेत.