नाशिक (प्रतिनिधी) :- मालकाने शहरात डिलिव्हरी करण्यासाठी दिलेल्या मालाचे 3 लाख 16 हजार रुपये वसूल करून ते कंपनीत न भरता त्या पैशांचा अपहार करणार्या टेम्पोचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अंकित वासुदेव येशी (रा. इरिगेशन कॉलनीजवळ, मखमलाबाद गाव, नाशिक) यांचे एमएच 15 एचएच 4751 या क्रमांकाचे टाटा कंपनीचे एस गोल्ड वाहन आहे. या वाहनावर महेश मोहिते (रा. बेलदारवाडी, म्हसरूळ, नाशिक) हा चालक म्हणून काम करतो.
दि. 6 जून रोजी सकाळी 9 च्या सुमारास महेश मोहिते याने जऊळके शिवारातील हिवलू लॉजिस्टिक (उडान) प्रा. लि. कंपनीत गेला. तेथे कंपनीचे ट्रान्स्पोर्ट मॅनेजर अमोल बर्वे यांनी आरोपी मोहिते यांनी आणलेल्या गाडीत 4 लाख 90 हजार 880 रुपये किमतीचा मोबाईल, सायकल, रेडिमेड कपडे, भांडी, बूट व चपला असा माल भरून दिला. तो माल नाशिक शहरात विविध ठिकाणी डिलिव्हरी करून आलेले पैसे कंपनीत भरण्यासाठी सांगितले होते; मात्र वाहनचालक मोहिते हा गाडीत माल घेऊन फिर्यादी येशी यांच्या रामकृष्ण येथील घराजवळ सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास त्यांना भेटला व येशी यांना म्हणाला, की मी कंपनीतून माल घेऊन आलेलो आहे.
नाशिकमध्ये मालाची डिलिव्हरी करून कंपनीमध्ये पैसे जमा करतो, असे सांगून निघून गेला. दरम्यान, आरोपी मोहिते याने 4 लाख 90 हजार 880 रुपये किमतीच्या मालापैकी 1 लाख 74 हजार 167 रुपये किमतीचा माल त्याने स्वत:च्या घरात ठेवून 3 लाख 16 हजार 713 रुपयांचा माल डिलिव्हरी करून फिर्यादी व कंपनीचा विश्वासघात करून डिलिव्हरीतून आलेली रक्कम घेऊन कुठे तरी पळून गेला आहे. त्याचा सर्वत्र शोध घेतला; मात्र तो मिळून आला नाही. या प्रकरणी येशी यांच्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात आरोपी महेश मोहिते या चालकाविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हळदे करीत आहेत.