वीज बिल थकल्याचा फोन आल्याने इसमाने एक अ‍ॅप डाऊनलोड केले अन् झाले असे काही

नाशिक (प्रतिनिधी) :- 3 महिन्यांचे वीज बिल थकले आहे असे सांगत इसमाला अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्याआधारे एफडी मोडून त्यातील 5 लाख 75 हजारांची रोकड ऑनलाईन काढून घेणार्‍या तोतया कर्मचार्‍याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी राहुल युवराज जाधव (रा. मिहीर पार्क रो-हाऊस, बुरकुले हॉलमागे, उत्तमनगर, सिडको) यांच्या वडिलांना दि. 20 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास 8250473836 या क्रमांकाच्या मोबाईलवरून एका इसमाचा फोन आला. मी एमएसईबीमधून बोलत आहे, असे भासविले, तसेच मागील महिन्याचे लाईटबिल थकित असल्याचे सांगून या तोतया कर्मचार्‍याने क्‍विक सपोर्ट या रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅपद्वारे मोबाईलचा अ‍ॅक्सेस घेतला.

त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांच्या बँक खात्यातील एफडी परस्पर मोडून त्यातील 5 लाख 75 हजार 11 रुपये 24 पैसे एवढी रक्‍कम जाधव यांच्या वडिलांच्या संमतीशिवाय काढून घेतली. त्यानंतर आपल्या वडिलांची अज्ञात इसमाकडून ऑनलाईन फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर जाधव यांनी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज बिजली करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!