नाशिक (प्रतिनिधी) :– घर बांधण्यासाठी पैसे आणण्यास नकार देणार्या पत्नीच्या गळ्यावर चाकूचे वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुमन राजू जाधव (वय 40) व राजू निवृत्ती जाधव (वय 50, दोघेही रा. नागसेननगर, वडाळानाका, द्वारका) हे पतीही पती-पत्नी आहेत. काल सायंकाळी फिर्यादी महिला सुमन जाधव ही आई ताराबाई तुकाराम लोंढे (रा. गांधीधाम, देवळाली गाव) येथे भाची सोनाली संदिप कदम हिच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेली होती. त्यावेळी फिर्यादीचा पती राजू जाधव हा तेथे आला. पत्नीकडे घर बांधण्यासाठी आणावेत असा तगादा लावला.

पैसे आणण्यास पत्नीने नकार दिला. याचा राग आल्याने पतीने तिला वाईट साईट शिवीगाळ दमदाटी केली. तसेच सोबत आणलेल्या चाकूने तिला ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या गळ्यावर दोन वार केले. या झटापटीमध्ये पत्नीच्या हाताच्या पंजाला चाकूचा वार लागल्याने ती जखमी झाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.