नाशिक (प्रतिनिधी) : खंडणी व मोक्काच्या गुन्ह्यात तीन महिन्यांपासून फरार असलेल्या गुन्हेगारास अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला यश आले आहे.
जयेश ऊर्फ जया हिरामण दिवे (वय २३, रा. सिद्धी टॉवर, इंद्रकुंड, पंचवटी, नाशिक) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. जया दिवेविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात खंडणी व महाराष्ट्र संघटित गुन्हेगार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल होता. जयेश ऊर्फ जया दिवे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, तो गुन्हा घडल्यापासून पसार झालेला होता. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ चे पथक त्याचा शोध घेत होते.

पोलीस अंमलदार विशाल देवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत जया दिवेविषयी खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ व पोलीस अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रवीण म्हसदे, आसिफ तांबोळी, नाजिम पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे व महेश साळुंके यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवरील म्हाडा बिल्डिंगसमोर सापळा रचला. त्यादरम्यान गुन्हेगार जया दिवे हा तेथे आला असता त्याला पोलीस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.
जया दिवे याच्याविरुद्ध सुमारे १४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ व गुन्हे शाखा युनिट-१ चे अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रवीण म्हसदे, आसिफ तांबोळी, नाझिम पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे व महेश साळुंके यांनी केली.