नाशिक (प्रतिनिधी) :- आगामी तीन वर्षात नाशिकचा खेळाडू भारतीय क्रिकेट संघात असावा यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष धनपाल शहा यांनी पत्रकार परिषदप्रसंगी केले.

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची त्र्यवार्षिक निवडणूक होत आहे. त्यासाठी 9 एप्रिल रोजी मतदान होणार असून दहा जागांसाठी अकरा जणांचे अर्ज आले आहेत. खेळाडू पॅनल कडून बोलताना धनपाल शहा पुढे म्हणाले की, आत्तापर्यंत आम्ही नाशिक जिल्ह्यात क्रिकेटचा विकास केला आहे. त्यासाठी लागणाऱ्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळेच अनेक रणजी खेळाडू नाशकातून घडले आहेत, मात्र आता रणजीपटू नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू घडविण्याचे काम आम्ही करणार आहोत, त्यात आम्हाला बऱ्यापैकी यश येत आहे.

माया सोनवणे, ईश्वरी सावकार, सत्यजित बच्छाव सारखे खेळाडू काही पावलेच दूर आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाची टोपी घालावी हाच आमचा प्रयत्न आहे. तालुका स्तरावर पुरुष क्रिकेट बरोबरच महिला क्रिकेट देखील पोहोचले आहे. क्रिकेटचे टॅलेंट वाढवण्यासाठी आम्ही जिल्हास्तरावर एखादा चांगला माजी खेळाडू देखील ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले, मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे येत्या नऊ तारखेला ही निवडणूक होत आहे. आमचा कारभार आत्तापर्यंत पारदर्शक ठरला आहे. त्याचबरोबर इथून पुढे असाच ठेवणार आहोत, त्यासाठी खेळाडू पॅनलला विजय करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. खेळाडू पॅनलच्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये अनिरुद्ध भंडारकर, राघवेंद्र जोशी, आर.पटेल, जगन्नाथ पिंपळे, विनायक रानडे, निखिल टिपरी, शिवाजी उगले, महेश मालवी, बाळासाहेब मंडलिक, महेंद्र आहेर, यांचा समावेश आहे. या सदस्यांना निवडून देण्याच्या आवाहन त्यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेस चेअरमन धनपाल शहा, सचिव समीर रकटे, सेक्रेटरी योगेश हिरे उपस्थित होते.