नाशिक (प्रतिनिधी) : गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सुमारे ६ लाख रुपये किमतीची देशी दारू स्वत:जवळ बाळगून त्याची वाहतूक करणार्याविरुद्ध कारवाई केली आहे.
याबाबत माहिती अशी, की काल (दि. २२) गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली, की चेहेडी जकात नाका, नाशिकरोडकडून सिन्नरकडे जाणार्या सर्व्हिस रोडवरून नाशिकरोड येथे एक इसम चोरट्या रीतीने त्याच्या ताब्यातील एमएच १५ सीएम ७४०१ या क्रमांकाच्या स्विफ्ट कारमध्ये देशी दारू बाळगून त्याची वाहतूक करीत आहे.

अशी माहिती प्राप्त झाल्यावर पोलीस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, पोलीस हवालदार गुलाब सोनार, प्रशांत वालझाडे, अतुल पाटील व शंकर काळे यांच्या पथकाने कारवाई करून महेश उपरी यादागिरी (वय ३६, रा. धामणी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) हा त्याच्या ताब्यातील स्विफ्ट कारमध्ये ६०४० रुपयांचा देशी संत्रा दारूचे १८० एमएल, ७५० एमएल असा माल व सहा लाख रुपये किमतीची कार असा एकूण ६ लाख ६ हजार ४० रुपये किमतीच्या मुद्देमालासह कबजात बाळगून वाहतूक करताना मिळून आला.
या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (इ) (अ)प्रमाणे नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार सोनार यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल, करण्यात आला असून, आरोपी महेश यादागिरी याला अटक करून मुद्देमालासह पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.