इंडिल्यूब ऑईल : उद्योग, प्रामाणिकता अन् सचोटीचे प्रतीक

नाशिक । निल कुलकर्णी : संजय सोनवणे यांनी आपण उद्योजक व्हावे, असे स्वप्न फार प्रारंभीपासूनच पाहिले. आपल्या स्वत:चा बॅ्रण्ड असावा असे त्यांना वाटे. स्वप्नपूर्तीसाठी प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा होता. विक्री आणि मार्केटिंग या क्षेत्रात येऊन स्वत:ला सिद्ध करण्यासह आपणही रोजगार निर्मिती करणारे उद्योजक व्हावे, ही मनीषा त्यांच्या मनात होतीच. त्यांच्या करिअरची सुरुवात महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीपासून झाली. तेथे फिल्ड ट्रायल्समधून अनुभव गाठीशी बांधताना त्यांनी करिअरची नवी क्षितिजे काबीज करण्यासाठी सचोटीने आणि प्रामाणिकपणे कौशल्यविकास केला. कंपनीत असताना फिल्ड ट्रायलमधून नवीन अनुभव विश्‍व अनुभवले. त्यानंतर व्हिडॉल ऑईल या कोलकात्याच्या टायडो ट्राईल कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून मुंबईत त्यांच्या करिअरला नवा अध्याय जोडला गेला. तेथे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संजय सोनवणे यांना दोन प्रमोशन मिळाले. आता एरिया मॅनेजर म्हणून पुण्यात स्थलांतरित झाले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी तेथील मोठ्या बहुराष्ट्रीय वाहननिर्मिती कंपन्यांच्या आरएनडी (संशोधन आणि विकास विभाग) मधील अधिकार्‍यांमध्ये टायडो ट्राईल कंपनीच्या आरएनडी अधिकार्‍यांमध्ये समन्वयक म्हणून कामाला सुरुवात केली. अनुभव आणि अभिनवता या गुणांमुळे संजय सोनवणे यांना फ्रान्स येथील एका कंपनीत कामाची संधी मिळाली. त्यानंतर दुबईतीलही एका कंपनीचा राष्ट्रीय प्रमुख अधिकारी (नॅशनल हेड) म्हणून त्यांच्या कार्याचा विस्तार होत गेला. या कंपनीत सेवा देताना त्यांनी कंपनीचा नवीन ब्रॅण्ड राज पेट्रोल यशस्वीरीत्या बाजारात उतरवून उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करीत यशाचा आलेख उंचावत ठेवला. करिअरची यशस्वी वाटचाल सुरू असताना त्यांच्यातील उद्योजक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. मिळालेल्या पगारी नोकरीवर समाधान मानतील ते संजय सोनवणे कसले..? आपणही उद्योग स्थापन करून उद्योजकतेमधून स्वअस्तित्वाचा शोध घ्यावा, अशी ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती; मात्र स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी कधीही घाई केली नाही. योग्य वेळ व देशोदेशीच्या मोठ्या कंपन्यांमधून अर्जित केलेला सशक्त अनुभव, तावून-सुलाखून विकसित केलेले कौशल्य आणि एक उच्च ध्येय ठेवून त्यांनी सन 2011 मध्ये मुंबईतील जनरल मॅनेजर या उच्चपदस्थ आणि भरगच्च पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन उद्योजकतेमध्ये पहिले पाऊल ठेवले.

इंडिल्यूब ऑईल ब्रॅण्डची मुहूर्तमेढ

सन 2012 मध्ये संजय सोनवणे यांनी उद्योजकतेची मुहूर्तमेढ रोवली. त्यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन तसेच मित्र व आप्तेष्ट यांना शेअर होल्डर करून त्यांच्या सहकार्याने इंडिल्यूब ऑईल कंपनीची स्थापना केली. 14 बॅ्रण्डची नोंदणी त्यांच्या कंपनीच्या नावावर आहे. सिंगापूर, तसेच दुबईच्या काही कंपन्यांसोबत इंडिल्यूबचा व्यावसायिक करार झाला आहे. काही खाद्य उत्पादन करणार्‍या कंपन्या, तसेच औषध कंपन्यांसाठी लागणारी ऑईल उत्पादने इंडिल्यूब कंपनीतर्फे आयात करून त्याचे वितरण भारतभर केले जाते. यासह वाहनांसाठी लागणारे सर्व ऑईल्सचे उत्पादन अत्याधुनिक यंत्रांच्या मदतीने तयार केले जातात. दुचाकीसाठी लागणार्‍या इंजिन ऑईलपासून ते ट्रक, जेसीबी व उद्योगांना लागणारे इंडस्ट्रीयल ऑईलचे उत्पादन त्यांच्या कंपनीत केले जातात. त्यामध्ये कटिंग ऑइल्स, वाहनांसाठी गिअर ऑईल्स ही ल्युब्र्रिकेशन ऑईल म्हणून कंपनीत तयार होतात. जगभरातील पहिल्या 5 मध्ये येणार्‍या ऑईल बॅ्रण्डच्या तुलनेचे त्यांना स्पर्धा करणारे ऑईल उत्पादने त्यांच्या कंपनीत उत्पादित होतात. त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे बेस ऑईल ते कोरियामधून आयात करतात. बेसऑईलमधून ल्युब्रिकेट ऑईल तयार केले जाते. त्यांची उत्पादने देशातील सात राज्यांत वितरित केली जातात. खाणकामासाठी लागणारी वाहने व यंत्रासाठीही ल्युब्रिेकेशन त्यांच्या कंपनीत तयार होतात. सिल्व्हासामध्ये त्यांच्या प्रकल्पात ऑईल उत्पादने तयार होतात. तर नाशिक येथील जऊळके येथे त्यांचे पॅकेजिंग युनिट कार्यान्वित आहे. आज त्यांच्या आस्थापनेत 27 कर्मचारी काम करतात.

 

कंपनीचा दर्जा आणि विविध सर्टीफिकेशन

इंडिल्यूब कंपनीने केवळ 8 ते 10 वर्षांत विविध मानांकने मिळविली. त्यात 9 आयएसओ प्रमाणपत्रे, सीआयआरटी (सेंट्रल इन्स्टिट्यूटचे ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट) चे परवाने त्यांच्या कंपनीने मिळविले आहेत. आज एमएसआरटीसी, जीएसटी, एचएमएल, महाराष्ट्र पोलीस विभाग, बीईएसटी (बेस्ट), महाराष्ट्र सरकार अशा अनेक सरकारी, तसेच खासगी आस्थापनांना त्यांच्या इंडिल्यूबचे ऑईलची उत्पादने पुरविली जातात.

ऑटो क्लिनिक नवीन संकल्पना

नवीन वाहन घेतल्यानंतर कंपनीच्या तीन मोफत सर्व्हिसिंग झाल्यानंतर वाहनधारक पुढील सर्व्हिसिंगसाठी खासगी गॅरेजची सेवा घेतात. येथील कारागीर कुशल असतात; मात्र त्यांच्याकडे अत्याधुनिक तंत्र व साधनसामग्री नसते. अशा होतकरू, हुशार आणि मॅकेनिकसाठी कौशल्यावर आधारित संघटित स्वरूपात काम करण्यासाठी संजय सोनवणे यांनी ऑटो क्लिनिक संकल्पना सुरू केली. ही संघटित वर्कशॉपची कल्पना येणार्‍या ग्राहकांना कंपनीच्या शोरूमच्या तोडीची दर्जेदार आणि अत्याधुनिक प्रणालीद्वारे वाहन सेवा देण्यासाठी सज्ज असेल, याची फ्रेंचाईझी घेणार्‍या तरुणाला वाहन दुरुस्ती, सेवेचे तंत्र, शिक्षण आणि प्रशिक्षण, तसेच अत्याधुनिक उपकरणे, साधनांनी युक्त वर्कशॉप ऑटो क्लिनिक उपक्रमातून देण्यात येत आहेत. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असून, त्यांचे पुण्यात आणि नाशिकमध्ये एकूण 7 फ्रेंचाईझी सुरू आहेत. शाश्‍वत नावाने मल्टिब्रॅण्ड वर्कशॉप लवकरच सुरू करणार आहे.

इलेक्ट्रीक वाहने आल्यानंतर कंपनीचे काय…?

येणार्‍या 5 ते 7 वर्षांत रस्त्यावर इलेक्ट्रीक वाहने मोठ्या प्रमाणावर धावणार आहेत. त्यावेळी वाहनांच्या ऑईलची गरज कमी होणार आहे. त्यामुळे नंतरच्या काळात इलेक्ट्रीक वाहनांसाठी लागणार्‍या बॅटरीचे उत्पादन करणे, चार्जिंग स्टेशनची उभारणी करणे आणि इलेक्ट्रीक वाहनांसाठी लागणारे सुटे भाग आणि इलेक्ट्रीक वाहनांचे सर्व्हिस सेंटर सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. यासह याच वर्षी बदलत्या काळानुसार ई-कॉमर्समध्ये उतरण्याचा संजय सोनवणे यांचा मानस आहे. खाद्यपदार्थ, रेडिमेड डे्रेसेस यांचा व्यापार ई-कॉमर्सच्या माध्यमातून लवकरच सुरू होणार आहे. थोडक्यात व्यवसायाचा विस्तार काळानुसार करून यशाचा आलेख आणि कंपनीचे अस्तित्व अधिक मजबूत अधिष्ठानावर उभे करण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे.

सामाजिक उपक्रमात हिरिरीने योगदान

संजय सोनवणे यांनी केवळ उद्योजक म्हणून स्वत:ची ओळख तयार केली नाही, तर सामाजिक उपक्रमात हिरिरीने योगदान देणारे कार्यकर्ते म्हणूनही ते उद्योग जगताला परिचित आहेत. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण देणे लागतो, असे ते सांगतात. रोटरी क्लब ऑफ नाशिकचे माजी अध्यक्ष, नाशिक मोटर मर्चंट्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष, ऑल इंडिया ऑटोमोबाईल स्पेअरपार्ट डिलर असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षपदीही त्यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. विविध महाविद्यालयांत ते यशस्वी उद्योजकता आणि बॅ्रण्ड मेकिंग, कौशल्य विकास यासह जाहिरात, विपणन, विक्री या आणि अशा विषयावर व्याख्याने देत असतात. विविध शिक्षणक्रमांतील विद्यार्थी त्यांच्याकडे वैयक्तिकरीत्या त्यांच्याकडे मार्गदर्शन घेत असतात.

‘निमा’मध्ये संजय सोनवणे उपाध्यक्ष हे असताना त्यांनी ‘मेक इन नाशिक’ हे उद्योजकतचे प्रदर्शन भरविण्यासाठी पुढाकार घेतला. त्याची फलश्रुती म्हणून गुजरातमध्ये जाणारे उद्योग त्यांनी नाशिककडे वळविण्यात यश मिळविले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजमध्ये गेली 20 वर्षे जोडलेले असताना त्यांना विक्रम सारडा, हेमंत राठी, स्व. दिग्विजय कपाडिया यांच्याकडून खूप मार्गदर्शन मिळाल्याचे ते नमूद करतात. नुुकतीच त्यांनी चेंबरचे को-चेअरमन म्हणून सूत्रे स्वीकारली. त्यानंतर पुढची ध्येयधोरणे काय, असे विचारताच ते म्हणतात, महिंद्रासारखा मोठा उद्योग नाशिकमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते सांगतात. नाशिकमध्ये मोठे उद्योग आल्यास त्यांचा परिणाम शहराच्या अर्थचक्रावर होऊन शहर विकसित होण्यासाठी मदत मिळते त्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी बांधील असल्याचे ते सांगतात. वडील मधुकर सोनवणे यांना प्रेरणास्थानी मानणारे संजय सोनवणे विवेकानंदांनाही आपला आदर्श मानतात. एका कंपनीत काम करताना तात्त्विक मतभेदामुळे कंपनी सोडावी लागली, हा संघर्ष कायम स्मरणात असल्याचे ते सांगतात. तत्त्व आणि नीतिमत्तेला धक्का लागत असल्याने आपण कंपनी सोडली, ही वाईट गोष्ट स्मरणात आहे, असे ते सांगतात, तर सन 2012 मध्ये कंपनीची स्थापना करताना ब्रॅण्ड रजिस्ट्रेशन झाल्यानंतर परमोच्च आनंद झाल्याचे ते सांगतात.

संजय मधुकर सोनवणे यांचा सुशिक्षित व सुखवस्तू कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील कोकण रेल्वेमध्ये स्थापत्य अभियंता म्हणून निवृत्त झाले. त्यामुळे शिक्षणाचा उज्ज्वल वारसा असणार्‍या घरात संजय सोनवणे हेदेखील मेकॅनिकल इंजिनिअर असून, त्यांनी एमबीएसह पत्रकारितेची पदवीही पूर्ण केली. सोनवणे घराण्यात कोणीही नोकरीशिवाय उद्योजक नव्हते, अशा कुटुंबातील ते पहिले उद्योजक ठरले; मात्र हा प्रवास जितका सातत्यपूर्ण अविरत मेहनतीचा तितकाच संयम आणि सचोटीचा होता. त्यामुळे त्यांनी बहुराष्ट्रीय कंपनीचा अधिकारी ते यशस्वी उद्योजक असा प्रवास अगदीच कमी कालावधीत पूर्ण करीत स्वत:च्या कार्यकर्तृत्वाने जगासमोर आदर्श निर्माण केला. आज त्यांच्या कंपनीत 14 उत्पादनांची निर्मिती होते. सातत्यपूर्ण योग्य प्रयत्न केल्यास यश तुमचेच आहे, असे ते सांगतात. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’ ही म्हण प्रसिद्ध आहे. संजय सोनवणे यांच्या यशस्वितेचा प्रवास पाहता प्रामाणिकता अन् सचोटीने व्यवहार करता यशस्वी उद्योगाचे तेलही गळे, असेच म्हणावे लागेल.

यशाचे गुपित काय..?

संजय सोनवणे यांनी यशाची कमान चढती ठेवली; मात्र त्यांनी केवळ पैसा कमावणे आणि स्वत:च लाभ घेणे असा स्वार्थी दृष्टिकोन कधीच ठेवला नाही, तर त्यांच्या ग्राहकांना त्यांनी स्वानुभवातून प्रशिक्षणही दिले. त्यांनी त्यांच्या ग्राहकांना लागणार्‍या ऑईलमध्ये कॉस्ट कटिंगचे तंत्र शिकविले. त्यांच्या समस्यांना समाधान देणारे काम त्यांनी उद्योजकतेसह सुरू ठेवले. यामुळे एखाद्या व्यक्तीला पाच लाखांचे ऑईल लागत असेल, तर तोच खर्च चार लाखांत कसा करता येईल, याचे प्रशिक्षण त्यांनी अनुभवातून अर्जित केलेल्या कौशल्यातून दिले. साहजिकच अल्पावधीत ग्राहकांचा त्यांच्यावर, तसेच त्यांच्या उत्पादनांवर विश्‍वास दृढ होत गेला. बर्‍याच वेळा ग्राहकांना दहा-पंधरा ऑईल किंवा ल्युब्रिकेशनची यादी दिली जात असे; मात्र संजय सोनवणे यांनी या ग्राहकांना केवळ पाच ऑईलमध्ये मल्टीपर्पज ऑईल ब्रॅण्ड तीच गुणवत्ता, दर्जा कायम ठेवून दिला. साहजिकच ग्राहकांच्या पैशांची बचत झाली. यातूनच त्यांच्या उत्पादनांसह त्यांचाही विश्‍वासाचा नवीन ब्रॅण्ड देशभर विकसित झाला. हेच आपल्या यशाचे गुपित आहे, असे ते सांगतात. काळाची पावले ओळखून बदलणार्‍या तंत्रज्ञानासह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनांमध्ये बदल करत राहणे ही गोष्ट त्यांनी कंपनीत नेहमीच कार्यान्वित ठेवली. स्वत:वरचा आत्मविश्‍वास माणसाला पुढे नेतो, असे ते म्हणतात. हा आत्मविश्‍वास सचोटी, प्रामाणिकपणा आणि अनुभव हेच माणसाला पुढे नेतात, असे ते सांगतात.

मनमिळाऊ, संतुलित व्यक्तिमत्त्व

संजय सोनवणे यांचा मूलमंत्र अनुकरणीय आहे. तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला चाके हा मंत्र त्यांनी दिला. जो ते स्वत:ही आत्मसात करीत आहेत. उद्योजक संजय सोनवणे आणि माणूस संजयजी यातील तुम्हाला कोण आवडते? असे त्यांच्या कंपनीच्या कर्मचार्‍यांना विचारले असता संजय सर म्हणजे आम्हाला माणूस म्हणून नेहमीच भावतात. कंपनी आम्हाला कधीच परकी वाटत नाही, तर कुटुंब वाटते, याचे कारण संजय सोनवणे सर आहेत, असे त्यांचे कर्मचारी नमूद करतात. कामे करताना कर्मचारी चुकला तर कधीही न चिडणारे संजयजी म्हणतात, की जो काम करतो, तोच चुकतो, त्याला समजून घेणे उद्योगामध्ये नेतृत्व करणार्‍याचे कर्तव्यच आहे. कोणालाही मदत करायची त्यांची तयारी नेहमीच असते. यासाठी ते जे काही करता येईल ते नेहमीच करण्यास तत्पर असतात, असे त्यांचे कर्मचारी सांगतात. मनमिळाऊ, शांत व संतुलित व्यक्तिमत्त्व असलेले संजय सोनवणे हे आमच्यासाठी नेहमीच आदर्श आहेत, असे त्यांच्या स्टाफमधील वरिष्ठ लोक सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!