Nashik : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली मोठी घोषणा; सामंत म्हणाले….

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये आयटी पार्क उभारण्यात येईल, अशी वल्गना सुरु होती. याचबरोबर केंद्र सरकारने देखील यास हिरवा झेंडा दाखवला होता. परंतु, नंतरच्या काळात हा प्रकल्प फिस्कटल्याने बारगळला. आता पुन्हा मंत्री उदय सामंत यांनी आयटी पार्कची मोठी घोषणा केली आहे. येणाऱ्या काळात नाशिकमध्ये आयटी व ॲग्रो इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

अंबड रेक्रीएशन सेंटर येथे अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा) व सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. यांच्या अडीअडचणीं बाबत आयोजित आढावा बैठकीमध्ये मंत्री उदय सामंत बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, जिल्ह्यामध्ये सुरूवातीला 100 एकर मध्ये आयटी क्षेत्र उभारण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे कृषी पूरक व्यवसाय व प्रक्रीया उद्योगांना विकसित करण्यासाठी नाशिकमध्ये आयटी व ॲग्रो इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यासाठी शासनामार्फत मदत केली जाईल. तसेच जिल्ह्यामध्ये डाटा सेंटरचा मोठा प्रकल्प लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही देखील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण असल्याने येथील उद्योग विकासाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पाणी, वीज व रस्ते यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी दरमहिन्याला जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांनी जिल्ह्यामधील उद्योजकां समवेत बैठकांचे आयोजन करण्यात यावे. ज्यामुळे जिल्ह्यामधील उद्योजकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मदत होईल. एमआयडीसी मधील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अमृत 2 या योजनेमार्फत उपाययोजना करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे येथे आकारण्यात येणाऱ्या घरपट्टीत झालेली वाढ लक्षात घेता त्याबाबत आवश्यक निर्णय घेवून औद्योगिक क्षेत्रासाठी असणाऱ्या नियमानुसार त्यावर योग्य निर्णय महानगरपालिकेने घ्यावा.

जकात नाक्याच्या बाजूला महानगरपालिकेची जागा असेल किंवा एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जागा असल्यास त्याठिकाणी येत्या 15 दिवसांमध्ये ट्रक टर्मिनलसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!