नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज टाकल्याच्या रागातून एका कुटुंबातील तीन जणांना दुसर्या कुटुंबातील सदस्यांनी मारहाण केल्याची घटना एकलहरा गावात घडली.
याबाबत पोलिसांनी दिेलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी रंजना अशोक पवळे (रा. मराठी शाळेच्या पाठीमागे, एकलहरा गाव) या व त्यांचे पती अशोक पवळे व मुलगा स्वप्नील पवळे हे तिघे जण त्यांच्या राहत्या घरासमोर शेकोटी करून शेकत होते. त्यावेळी फिर्यादीचे पती यांनी मोबाईलवरून गावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर गरिबातील गरीब माणसाकडून महादेव मंदिरासाठी फूल नाही, फुलाची पाकळी मिळाल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहोत, असा मेसेज टाकल्याने आरोपी शंकर झुंबरराव धनवटे, नीलेश विश्राम धनवटे, अतुल विश्राम धनवटे, राजाराम धोंडीराम धनवटे (सर्व रा. एकलहरा गाव) यांनी हा राग मनात धरून फिर्यादी पवळे व त्यांच्या पतीला व मुलाला लोखंडी रॉडने व दगडाने मारहाण केली, तसेच शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीत फिर्यादीच्या कानातील झुबे व पोत गहाळ झाली.
दरम्यान या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.