नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : रब्बी हंगामासाठी शनिवार दि .५ फेब्रुवारी रोजी नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या डाव्या कालव्यातून ३०० क्यूसेसने पाणी सोडण्यात आले होते. मात्र गेल्या कित्येक दिवसात कालव्याची दुरुस्ती न केल्यामुळे हे कालवे ठिकठिकाणी फुटत आहे.

काल (दि ०६ ) रोजी त्याचीच पुनरावृत्ती होत हा कालवा ७ की.मी अंतरावर म्हणजेच या भागातील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या मोरीचा स्लॅब कोसळल्याने हजारो क्युसेस पाणी वाया गेले असून यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे

दरम्यान हा कालवा 105 वर्ष जुना झालेला असून गोदावरी डावा कालवा काल फुटल्याने हजारो क्यूसेक पाणी वाया गेले. तर शेतजमिनीची माती वाहून गेल्याने रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी व वारंवार होणाऱ्या अशा घटनांची जलसंपदा विभागाने दखल घेऊन या कालव्याची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.