दोन वर्षांच्या खंडानंतर नाशिककरांनी लुटला मडबाथचा आनंद

 

नाशिक – चमरलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदिनी डेअरी फार्म येथे सालाबादप्रमाणे आणि दोन वर्षांच्या खंडांनंतर आयोजित मडबाथचा (माती स्नानाचा) अबाल वृद्धांसह हजारो लोकांनी आनंद लुटला.

संगीताच्या तालावर नाचून लोकांनी आपला आनंद व्यक्त केला. लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून दुर्गमभागातून हे सारे लोक आले किंवा काय असेच या भागातून येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटत होते. आपल्या लोकांनाही ओळखणे कठीण जात होते असा हा नजारा होता.

महेश शहा, चिराग शहा व योगगुरु नंदू देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 25 वर्षांपासून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे दोन वर्षे या उत्सवात खंड पडला होता. मात्र यावर्षी लोकांचा उत्साह दांडगा दिसला. मुंबई, पुणे तसेच राज्याच्या काही भागातील आणि नाशिक महानगरातील सुमारे 1000 लोकांनी मडबाथचा आनंद लुटला. खरंतर हनुमानजयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. मात्र यावेळी त्यात बदल करण्यात आला आणि हनुमानजयंतीच्या आधीच्या रविवारी म्हणजे रामनवमीला त्याचे आयोजन करण्यात आले.

महिनाभर आधीपासून या कार्यक्रमाची तयारी करण्यात येते. सकाळी 5.45 वाजेपासून हा कार्यक्रम सुरु झाला.बघता बघता लोकांचे थवेच्या थवे येथे येऊ लागले आणि स्वतःच्या अंगाला चिखल फासू लागले.पूर्वी एका पाटीत चिखल घेऊन प्रत्येकाला वैयक्तिकरित्या तो फासावा लागत होता. मात्र यावेळी 25 फूट लांबीचा खास टब तयार करण्यात आला होता आणि  त्यात चिखल होता. या टबमध्ये 25 ते 30 लोक एकाचवेळी उतरून व अंगाला चिखल लावून बाहेर येत होते.नंतर एक तास उन्हात उभे राहून चिखल वाळल्यानंतर तेथे खास बसविण्यात आलेल्या शॉवरखाली उभे राहून मडबाथचा आनंद लुटत होते.


मडबाथ घेणाऱ्या मान्यवरांमध्ये विख्यात उद्योजक अशोक कटारिया, विशाल उगले, अभय शाह, बाळासाहेब काठे, भगवान काळे, डॉ. ज्ञानेश्वर चोपडे, डॉ. नितीन रौंदळ, वैभव शेटे, ज्ञानेश्वर गायकवाड, अमित घुगे, मिलिंद वाघ, ज्येष्ठ पत्रकार प्रियदर्शन टांकसाळे, योगेश कमोद, किशोर बेलसरे, संदीप जाधव, विजय पाटील, मनोज देसाई, गौरव देसाई, जयेश देसाई आदींसह नाशिक सायकलिस्ट, जॉगर्स ग्रूप, जल्लोष ग्रूप, पंचवटी व्यापारी ग्रूप, नाशिक इको ड्राईव्ह, चामरलेणी इको ड्राईव्ह आदी ग्रुपचे सदस्य सहभागी झाले होते. मडबाथनंतर मिसळपार्टीचाही सर्वांनी आनंद लुटला.

तयारी आणि मडबाथचे फायदे

वारुळाची माती गोळा केली जाते. आठ दिवस आधी ही माती, लाल माती आणि मुलतानी माती भिजवली जाते. संपूर्ण शरीराला माती लावल्यानंतर दीड तासानंतर आंघोळ केली जाते. ही माती लावून आंघोळ करण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे याने शरीरातील सर्व उष्णता निघून जाते आणि त्वचा चकचकीत होते, असे नंदू देसाई यांनी सांगितले.

खूप छान अनुभव

मडबाथचा आनंद लुटतांना बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया

नाशकात मडबाथचे आयोजन केले जाते आणि त्यासाठी मला आमंत्रित केल्याचे समजल्यानंतर त्याचा आनंद लुटण्यासाठी मी आवर्जूनआलो आणि माझ्यासाठी हा सुखद धक्काच ठरला.शेकडो लोकांना आमंत्रित करून इतका चांगला उपक्रम आणि त्यानंतर मिसळपार्टी म्हणजे सारेकाही अभूतपूर्वच म्हणावे लागेल.

– अशोक कटारिया
विख्यात बांधकाम व्यावसायिक

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!