हिरवाईने नटणार गोदानगरी; मनपा करणार “इतके” वृक्षारोपण

 

‘स्वच्छ नाशिक, हरित नाशिक’चे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून आता नाशिक महानगर पालिकेच्या वतीने नाशिक शहरात १ लाख वृक्षारोपण करण्यात येत आहे.

१ लाख वृक्षारोपणाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी विविध सामाजिक संस्थानी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. वृक्षारोपणाचे काम देखील प्रगति पथावर सुरू आहे. सद्यस्थितीत ५० हजार वृक्षारोपण हे सीएसआर फंडातून केले जात आहे. याशिवाय इंडियन ऑइल कंपनीच्या वतीने फाळके स्मारक येथील बुध्द विहार याठिकाणी ५०० झाडे लावण्यात येत आहे.

भारत पेट्रोलियम कंपनी देखील वृक्षारोपणासाठी इच्छुक आहे. या कंपनीला देखील महापालिकेच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय आनंदवल्लीत नदीकिनारी पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने २००० वृक्षांची लागवड केली जात आहे.

पिंपळ, पेरू, चिंच, तामणने बहरणार शहर

अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या वतीने देखील विविध जातीची २००० रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील देवराई नर्सरी येथून १३६५ रोपे प्राप्त झाली असून यामध्ये पिंपळाची ८५०, पेरु १२५, आंबट चिंच ४०, तामण ३५० रोपे प्राप्त झाली आहे. १ लाख वृक्षारोपण मोहिमेत विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे.

हरित नाशिक संकल्पना पूर्ण करण्यासाठी नाशिकरोड, पश्चिम, पूर्व, पंचवटी, नविन नाशिक अशा सहाही विभागांत वृक्षारोपण केले जाणार आहे. मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या सूचनेनुसार उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंढे वृक्षारोपण मोहीमेची अंमलबजावणी करीत आहेत. मोहीम यशस्वी होण्यासाठी उद्यान विभाग कार्यरत आहे. मुख्य म्हणजे केवळ वृक्षारोपण करण्यावरच महानगरपालिकेचा भर नसून वृक्षारोपण केलेल्या झाडांची देखभाल करण्यासाठी देखील महानगर पालिका प्रयत्नशील आहे.

याशिवाय वृक्षारोपण करणार्‍या संस्थांनी स्व पुढाकाराने वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष देखभालीची देखील जबाबदारी घेतली आहे. हरित नाशिकचे स्वप्न साकार करण्यासाठी मनपाची ही मोहीम मोलाची ठरणार आहे. या मोहिमेला इतर संस्थांची मिळालेली साथ उपयुक्त ठरणार आहे.

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें…
पक्षी ही सुस्वरें आळविती…अशा शब्दांत संत तुकाराम महाराज यांनी वृक्षांचे, निसर्गाचे महत्व अधोरेखीत केले आहे. याच भावनेने नाशिक शहर हिरवगार होण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!