Nashik News : खासगी सावकाराकडून किडन्या विकून पैसे वसूल करण्याची धमकी देत एकाचे अपहरण

नाशिक (प्रतिनिधी) : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून त्याच्या किडन्या विक्री करण्याची धमकी देणार्‍या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अश्‍विनी भूषण भावसार (वय 26, रा. काश्मिरा अपार्टमेंट, अभियंतानगर, कामटवाडे, नाशिक) यांचे पती सुभाष भावसार घरी असताना आरोपी वैभव माने व त्यांच्यासोबत असलेला एक इसम व महिला यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.

त्यानंतर पैशाच्या वादातून भूषण भावसार यांना घरातून बळजबरीने त्यांच्या मोटारसायकलीवर बळजबरीने बसवून घेऊन गेले. त्यानंतर पती भूषण भावसार याने पत्नीस फोन केला असता या मोबाईलवर आरोपी वैभव माने याने “आज माझे साडेसात लाख रुपये आणून दिले नाहीत, तर तुमच्या पतीच्या किडन्या विकून टाकीन,” अशी धमकी फिर्यादी अश्‍विनी भावसार यांना दिली.

त्यामुळे घाबरलेल्या भावसार यांनी पतीला खासगी सावकाराच्या तावडीतून वाचवण्यासाठी त्याच्या विनवण्या केल्या मात्र त्याने दया दाखवली नाही. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वैभव माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!