नाशिक (प्रतिनिधी) :- गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी नाशिक पोलीस अॅक्शन मोडवर आले आहे. परिमंडळ – 1 मधील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा धडाका पोलिसांनी सुरु केला.

रात्री 8 ते 11 व पहाटे 1 ते 4 या दरम्यान परिमंडळ-1 मधील पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर व मुंबई नाका या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रोज सहा ते सात पथके नेमुन पायी पेट्रोलिंग, कोंबिंग ऑपरेशन, टवाळखोरांवर कारवाई, गुन्हेगार शोधमोहीम, हत्यार प्रतिबंधक कारवाई, पाहिजे असलेल्या आरोपींची तपासणी, रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी, तडीपार आरोपींची तपासणी व इतर कारवाया या विशेष मोहीमेतंर्गत सुरु करण्यात आल्या आहेत.
या मोहीमेत 83 टवाळखोरांवर कारवाई करण्यात येऊन 35 तडीपार गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात आली. त्याबरोबर अवैध हत्यार प्रतिबंधक कारवाई अंतर्गत 1, अवैध दारुविक्री 1, पाहिजे आरोपींची तपासणी 10, रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी 14, सर्व्हेलन्स आरोपी तपासणी 14, हिस्ट्रीशिटर आरोपी तपासणी 20, वेळेत अस्थापना बंद न केल्यामुळे कारवाई 7 व संशयास्पद फिरणार्या व्यक्तींची तपासणी 1 अशा एकुण 186 कारवाया या मोहीमेतंर्गत करण्यात आल्या. प्रत्येक पथकात एक पोलीस अधिकारी, 5 पुरुष अंमलदार, 2 महिला अंमलदार यांचा समावेश होता.
पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे, दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे, इरफान शेख, अशोक साखरे, दत्ता पवार, साजन सोनवणे, रियाज शेख व सुनिल रोहकले यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई सुरु आहे. या मोहीमेचा प्रभावी परिणामी दिसून येत असल्याने यापुढेही ही मोहीम सुरुच राहणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.