आज पावसाची उसंत; कांदा, सोयाबिनसह अनेक पिकांवर अतिवृष्टीचा परिणाम

नाशिक (प्रतिनिधी) :- मागील सहा दिवसांपासून नाशिकमध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसाने चांगला हाहा:कार उडविलेला आहे. नाशिक शहरातील प्राचीन रामसेतू पुलाला तडे गेले आहेत. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे नुकसान झालेले आहे आणि रोपवाटिकेतील कांद्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभाग सर्व एकूण या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

सहा दिवसांपासून सुरू असलेल्या नाशिक जिल्ह्यातील पाऊस हा शनिवारीदेखील कायम होता; मात्र शनिवारी काही काळ पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे या काळात शेतकर्‍यांनी आपल्या शेतीच्या कामांना सुरुवात केली, तर नागरिक आपली कामे करताना दिसून आली सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही प्रमाणात पिकांना नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये विशेष करून कळवण व निफाड या भागातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे; परंतु जिल्ह्यामध्ये जेवढी पेरणी झाली आहे, त्याच्या 0.1 टक्‍का नुकसान आतापर्यंत झाल्याचे समोर आले आहे. उर्वरित ठिकाणी सोयाबीनची पिके ही सुरक्षित असल्याचे समोर येत आहे, तर दुसर्‍या बाजूला मात्र कांद्याचे रोप लागवड करणार्‍या रोपवाटिकेमध्ये काही अंशी कांद्याच्या रोपांची नुकसान झाले आहे.

त्यामुळे येणार्‍या काळात कांदा उत्पादन पिकाला काही प्रमाणात फटका बसू शकतो, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर जिल्ह्यातील इतर भागांमध्ये सुरू असलेल्या भाजीपाला लागवडीचे फारसे काही नुकसान झालेले नाही. कारण आतापर्यंत पाऊस नव्हता. त्यामुळे शेतकर्‍यांनी फारच पेरणी करण्यामध्ये रस दाखविला नाही. आता पाऊस सुरू झाल्यानंतर भाजीपाला लागवडीला सुरुवात झाली आहे.

नाशिक शहरातील प्राचीन काळी असलेल्या रामसेतू पुलाला तडे गेले आहेत, ही माहिती मिळाल्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्‍त जयंत नाईकनवरे आणि महापालिका आयुक्‍त रमेश पवार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे आणि सध्या हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तसेच शहरातील वेगवेगळ्या पुलांवर होणार्‍या गर्दीला नियंत्रण करण्यासाठी कडक पावले उचलण्याचे आदेश पोलीस आयुक्‍त जयंत नाईकनवरे यांनी दिले आहेत, तसेच सर्व पूल हे नो पार्किंग झोन करण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पिकांना पावसाचा फटका बसल्याचा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्‍त केला जात आहे. आतापर्यंत 23 जनावरे दगावली आहेत.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील रगतविहीरजवळील असलेल्या फणसपाडा येथील बंधारा फुटल्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण गावांमध्ये आणि शेतीत पाणी असल्याचा प्रकारदेखील या गावात झाला आहे.

पंचनामे शासनाला पाठविले : सोनवणे
याबाबत बोलताना नाशिक कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी सांगितले, की शेतकर्‍यांनी पिकांची लागवड करताना एकूण पावसाचा आणि परिस्थितीचा आढावा घेऊन पिकांची लागवड करावी, जेणेकरून जास्त नुकसान शेतकरी वर्गाचे होणार नाही. आतापर्यंत ज्या ज्या भागात पंचनामे झाले आहेत, त्या त्या भागातील अहवाल हा राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे, असेदेखील सांगून सोनवणे पुढे म्हणाले, की शेतकर्‍यांनी आपल्या जनावरांची आणि शेतीची काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

शनिवारी संध्याकाळपर्यंत नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून 6602, कडवा धरणातून 1294, वालदेवी धरणातून 183, गंगापूर धरणातून 2754 आळंदी धरणातून 961, होळकर पुलाखालून 6298, नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून 35904 क्युसेक याप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!