नाशिकरोड (प्रतिनिधी):- जुन्या वादातून एका युवकावर धारदार कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना काल रात्री घडली असून जखमी युवकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्राणघातक हल्ला प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
याबाबत फिर्यादी श्री उर्फ मोनु संजय वर्मा (वय २७, रा, देवळालीगाव नाशिकरोड) याने फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हटले आहे. मित्र समीर उर्फ मुस्तफा सलीम खान पठाण राहणार विहितगाव, नाशिकरोड त्याच्या ताब्यातील एक्टीवा दुचाकी गाडी नंबर एमएच 15 एफके 3446 ही पेट्रोल भरण्यासाठी लॅम रोड येथील पेट्रोल पंप येथे जात होतो. गाडी मोनु वर्मा चालवित होता. हे दोघे जात असताना सौभग्य नगर, लॅमरोड वरील लक्ष्मी फार्मा मेडिकल समोर नाशिकरोड बाजूकडून आलेल्या पिवळ्या गोल्डन कारने पाठी मागून धडक दिली.

कार मधील संशयित बाळा जाधव व इतर तीन इसम यांनी समीर बरोबर जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करीत हातातील कोयत्याने समीर याच्या डोके व छातीवर वार केले. मोनू वर्मा हा सोडवण्यासाठी गेला असता,त्यालाही मारहाण केली, समीर याच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव झाल्याने मोनू यांने अरडाओरड केली. त्यावेळी हल्लेखोर देवळाली कॅम्प च्या दिशेने पळून गेले. नागरिकांच्या मदतीने समीर यास प्रथम बिटको नंतर खाजगी रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्याहादे,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनरीक्षक गोसावी,गुन्हे शोध पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक रामदास विंचू करीत आहे.
समीर पठाण व बाळा जाधव यांची पूर्वी मैत्री होती, उड्डाण पूल खाली भरणाऱ्या भाजी बाजारात दोघांचा व्यवसाय होता,काही आर्थिक कारण मुळे या मैत्रीचे रूपांतर वादात झाले,या दोघांमध्ये यापूर्वी अनेकदा हानामाऱ्या झालेल्या आहेत,समीर पठाण यांच्या वर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हांची नोंद आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या २५ नोव्हेंबर रोजी नाशिकरोड मधील मध्यवर्ती ठिकाण म्हणून असलेल्या शाहू पथ येथील विशाल गोसावी या वडापाव विक्रते वर तीन युवकांनी कोयत्याने हल्ला करून जबर जखमी केले. या हल्लेखोरांना नाशिकरोड पोलिसांनी पकडून त्याची त्याच परिसरात धिंड काढून चोप देऊन गुन्हेगारी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत असताना अवघ्या दहा बारा दिवसात दुसरा हल्ला झाल्याने पोलीसांनची डोकेदुखी वाढली आहे.