नाशिकरोड (प्रतिनिधी):- साध्य देशभरात सुरू असलेल्या अग्निपथ लष्करी भरती धोरणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाने नाशिकरोड व देवळाली कॅम्प परिसरात जमावबंदीचे आदेश पारित केले आहे,आर्टलरी सेंटर रोड व रेल्वे स्थानक परिसरात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने नव्याने जाहीर केलेल्या अग्निपथ लष्कर भरतीच्या विरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहे.अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून या तरुणांनी उग्र आंदोलन हाती घेतले आहे.केंद्र व राज्य सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या अनेक रेल्वे गाड्यांचे जाळपोळ करून केंद्र सरकारच्या धोरणाचा कडक विरोध या आंदोलक करतांना दिसत आहे.

त्याचे पडसाद नाशिक शहरात उमटू नये म्हणून आयुक्तालयाने सोमवार २० रोजी जमावबंदीचे आदेश जारी केले आहे,त्यात उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर्टलरी सेंटर अशोक चक्र गेट, खोले मळा, कारगिल गेट वडणेर गाव, कॅट गेट, नाशिक पुणे महामार्ग, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील स्व. बाळासाहेब ठाकरे मैदान (बुचडी मैदान) आंनद रोड, छावणी परिषद कार्यालय,एअर फोर्स देवळाली,तसेच नाशिकरोडला रेल्वे स्थानक पूर्वे पश्चिम बाजूला ३०० मिटर पर्यंत परिसरात संचार बंदी लागू करण्यात येणार असल्याचे परिपत्रक सहायक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ यांनी पारित केले आहे.या जमावबंदीच्या काळात अनावश्यक गर्दी करणे,ज्वलंतशील, अग्निशस्त्र घातक हत्यारे बाळगणे किंवा घेऊन फिरणे मनाई आहे.
त्या अनुषंगाने उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर,पोलीस निरीक्षक विष्णु पगारे,नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे,पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, राजू पाचोरकर, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे,नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे पोलीस आयुक्त कार्यालयाने अवाहन करण्यात आले आहे.