पोलीस जावयाने केली सासऱ्यांची हत्या; नाशिकरोडला रुग्णालयात ग्रामस्थांचा गोंधळ

मयत निवृत्ती सांगळे

नाशिकरोड (प्रतिनिधी) :– पोलीस दलात कार्यरत असलेल्या पती व त्याची पत्नी यांच्यात झालेल्या वादातून पतीने केलेल्या हल्ल्यात सासऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. हल्लेखोर पतीला तत्काळ अटक करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालून मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने एकच खळबळ उडाली.

या बाबत अधिक माहिती अशी की, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा व नाशिक ग्रामीण मधील मनमाड पोलीस ठाण्यातील दंगा नियंत्रण विभागात कार्यरत असलेल्या सुरज देविदास उगलमुगले याचे आणि पत्नी पूजा यांच्या कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. या वादामुळे पूजा ही आपले आई वडील राहत असलेल्या सिन्नर तालुक्यातील दोडी दापुर या ठिकाणी रागाने गेली होती. गेल्या दोन दिवसांपूर्वी सुरज उगलमुगले हा आपल्या पत्नीला भेटण्यासाठी दोडी दापुर येथील सासुरवाडीला गेला.

किरकोळ वाद झाल्यानंतर त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाला. राग अनावर झाल्यानंतर सुरज उगलमुगलेने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने सासरे निवृत्ती दामोदर सांगळे (वय 58) सासु शीला निवृत्ती सांगळे (वय 52) व पूजा सुरज उगलमुगले यांच्यावर हल्ला चढवला व त्यानंतर तेथून पळ काढला.

प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून सुरज उगलमुगले बरोबर त्याचा एक साथीदार ही घटनास्थळी होता. नातेवाईक व दोडी गाव दापूर येथील ग्रामस्थांनी तिघांनाही उपचारार्थ नाशिकरोड सिन्नरफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सासरे निवृत्ती दामोदर सांगळे यांचा आज सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती नातेवाईक व ग्रामस्थांना समजतात त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन हल्लेखोर जावई सुरज यास तत्काळ अटक करावी व इतर मागण्यांसाठी मृतदेह ताब्यात न घेण्याचा हट्ट घरला.

घटनास्थळी नाशिक ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, नाशिक शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. नाशिक येथे राहत असताना सुरज उगलमुगले हा पत्नीस त्रास देत असल्याने ती उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात गेली होती. मात्र उपनगर पोलिसांनी तिची तक्रार न घेतल्याने हल्लेखोर हा मोकाट राहिला व त्याने हल्ला केला. त्यामुळे उपनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर निवृत्ती सांगळे यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करिता पाठवण्यात आला आहे. सूरज हा अद्यापही फरार असून त्याला अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!