नाशिक (प्रतिनिधी) :- सटाणा येथील कंधाणे फाटा येथे झालेल्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले, की सटाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कंधाणे फाटा, मोरेनगर शिवारात असलेल्या हॉटेल गुरुकृपाच्या पाठीमागे दि. 3 एप्रिल रोजी 45 वर्षीय घमाजी रंगनाथ माळी याचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाहणी करून तपासाला सुरुवात केली असता कोणताही पुरावा प्रथमदर्शनी उपलब्ध झाला नव्हता.
त्यानंतर माळी कुटुंबाची चौकशी करीत असताना त्यांनी कोणाशीही वैर नसल्याचे सांगितले. पोलिसांना आलेल्या संशयावरून संशयित आरोपी हिरामण नामदेव पवार (रा. मळगाव, ता. सटाणा, सध्या कंधाणे फाटा, मोरेनगर शिवार) याला संशयावरून ताब्यात घेतले असताना हिरामण पवार याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपासासाठी हिरामण पवार याला ताब्यात घेतले असता त्याने सांगितले, की दि. 2 एप्रिल रोजी रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान घमाजी माळी हा घरी होता. अंतर्गत वादातून वाद झाल्याने त्याच्या डोक्यावर बाटली मारून त्यास जखमी केले व दगड डोक्यात घालून त्याची हत्या केली व त्याचे शव त्या ठिकाणी टाकून निघून गेले.
पोलिसांनी हिरामण पवार यास अटक केली असून, त्याला पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस निरीक्षक राहुल गवई, पोलीस कर्मचारी कदम, जिभाऊ पवार, शिंदे, अजय महाजन, अतुल आहेर, विजय वाघ, निरभवणे, चौरे, शिंदे, मोरे, साळुंके, शेवाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिरोडे, विठ्ठल बागूल, संजय पाटील, नामदेव खैरनार, भगवान निकम, बापू पारखे यांच्या पथकाने केला.