शालिमार येथे शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन

नाशिक (राजन जोशी) :- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सर्वत्र राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. त्यातच नाशिक शहरात शालिमार येथील शिवसेनेच्या कार्यालयात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे शक्तिप्रदर्शन केले.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड उभारले आहे. यानंतर राज्यात शिवसैनिक एकत्रित होऊन शक्तीप्रदर्शन करत आहे. मुंबईत शिवसेनेच्या कार्यालयात ज्याप्रमाणे शिवसैनिक एकत्र झाले त्याच प्रमाणे आज शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी “शिवसेना जिंदाबाद”, “ताकद कोणाची… शिवसेनेचीच….” अशा प्रकारच्या घोषणा देऊन शक्तिप्रदर्शन केले.

यावेळी काही काळ शालिमार रस्त्यावरील वाहतूक सुद्धा थांबवण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिवसेना कार्यालय जवळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या शक्तिप्रदर्शन याप्रसंगी शिवसेना नेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे, वैभव ठाकरे, वैभव खैरे यांच्यासह शहरातील पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक व महिला यावेळी उपस्थित होते. उद्धव ठाकरेंना समर्थन म्हणून हे शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!