रसिका शिंदेची अष्टपैलू कामगिरी; नाशिकचा दणदणीत विजय

नाशिक (प्रतिनिधी) :- शिरपूर येथे सुरू असलेल्या ऑल इंडिया वुमन्स टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात नाशिकच्या रसिका शिंदे हिने केलेली धडाकेबाज फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजीतही उत्तम कामगिरी केल्याने नाशिकला रायजिंग प्लेअर्स या संघाविरूद्ध विजय मिळवता आला.
नाशिक क्रिकेट असोसिएशनचा संघ धुळे तालुक्यातील शिरपूर येथे क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. पहिल्या सामन्यात पराभूत होणार्‍या संघात रसिका शिंदेचा समावेश नव्हता, मात्र दुसर्‍या सामन्यातील तिच्या समावेशानंतर नाशिकने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना नाशिक क्रिकेट असोसिएशनच्या संघाकडून अनन्या साळुंके आणि रसिका शिंदे हिने तडाखेबंद फलंदाजी करीत पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली.
साळुंके हिने 46 धावा केल्या. तर रसिका शिंदे हिने नाबाद 66 धावा केल्या. त्यात तिने 8 चौकार आणि दोन षटकार खेचले. तेजस्वीनी बटवालहिने 18 धावा केल्या. नाशिकने 20 षटकात 3 बाद 149 धावा केल्या. त्याला उत्तर देताना रायझिंग प्लेअर्सचा संघ 101 धावांत गारद झाला. नाशिकतर्फे पुजा वाघ हिने सर्वाधिक 13धावांत पाच गडी बाद केले. एश्‍वर्या वाघ हिने 2 गडी बाद केले.
विजयी संघाला प्रशिक्षक भावना गवळी यांचे मार्गदर्शन लाभले.अष्टपैलू कामगिरी करणार्‍या रसिकाला या सामन्यात सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!