नाशिक (प्रतिनिधी) : मखमलाबाद रोडवरील मोकळ्या जागेत एका अज्ञात इसमाचा खून करण्यात आला होता; मात्र त्यावेळी त्याची ओळख पटत नव्हती. ही ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.
ऋषिकेश दिनकर भालेराव (वय १९, रा. सातपूर, नाशिक) असे खून झालेल्या त्या युवकाचे नाव आहे. शनिवार दि. २० रोजी मखमलाबाद रोडवरील हमालवाडीजवळ एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी पाहणी करून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला; मात्र ती पटू शकली नाही.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता प्रथम मिसिंगच्या नोंदी तपासल्या. तेव्हा ऋषिकेश नामक युवक बेपत्ता असल्याची नोंद आढळली. पोलिसांनी त्याच्या नातलगांना बोलावून त्या मृतदेहाची ओळख पटविली. ऋषिकेशची हत्या कोणी व का केली, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.