नाशिक (प्रतिनिधी) : पतीला व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज पाठवून जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन पत्नी बेपत्ता झाल्याची घटना त्रिमूर्ती चौकात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की खबर देणार संदेश नारायण देवकर (रा. गणनायक अपार्टमेंट, त्रिमूर्ती चौक, सिडको) यांची पत्नी सविता देवकर हिने तिच्या मोबाईलवरून पतीला व्हॉट्सअॅपवर एक चिठ्ठी पाठविली. त्यात “मी माझे आयुष्य कधी पण संपवू शकते,” असा संदेश लिहिलेला होता.

त्यानंतर पतीने पत्नीच्या आईला फोन करून विचारले; मात्र तोपर्यंत देवकर यांची पत्नी घरातून निघून गेलेली होती. ती उशिरापर्यंत घरी आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ती आढळून आली नाही. या प्रकरणी बेपत्ता झाल्याची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक आवारे करीत आहेत.